“राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा म्हणजे ‘उठ दुपारी-घे सुपारी’ हा प्रकार”; ठाकरे गटाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:41 AM2024-04-10T11:41:38+5:302024-04-10T11:42:16+5:30

Thackeray Group Vs Raj Thackeray: राज ठाकरेंकडे काही पर्याय राहिलेला नसेल. नाहीतर ईडीच्या दरवाजात जावे लागेल, अशी शंका व्यक्त करत ठाकरे गटाकडून महायुतीला पाठिंबा देण्याबाबत टीका करण्यात आली आहे.

thackeray group sharad koli reaction over mns raj thackeray supported mahayuti | “राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा म्हणजे ‘उठ दुपारी-घे सुपारी’ हा प्रकार”; ठाकरे गटाचा टोला

“राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा म्हणजे ‘उठ दुपारी-घे सुपारी’ हा प्रकार”; ठाकरे गटाचा टोला

Thackeray Group Vs Raj Thackeray: मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसेच लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा करून मनसैनिकांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले. राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांच्या निर्णयावर महाविकास आघाडी आणि महायुतीतून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्याने यावरून जोरदार टीका केली आहे. 

नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांना चांगलाच दम भरला असेल. त्यामुळेच त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असेल. अन्यथा राज ठाकरे काय बिनशर्त पाठिंबा देणाऱ्यातला माणूस आहे का? राज ठाकरेंकडे काही पर्याय राहिलेला नसेल. त्यामुळेच त्यांना भाजपाला पाठिंबा द्यावा लागला असेल, नाहीतर ईडीच्या दरवाजात जावे लागेल, या शब्दांत ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयावर हल्लाबोल केला. 

राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा म्हणजे ‘उठ दुपारी-घे सुपारी’ हा प्रकार

राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिलेला नाही. जर त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असेल तर त्यांनी एक नाही अनेक पोळी भाजून घेण्यासाठी हा पाठिंबा दिला असेल. राज ठाकरेंचे कसे आहे, उठ दुपारी आणि घे सुपारी यातला प्रकार आहे, असा खोचक टोला शरद कोळी यांनी लगावला.

दरम्यान, एकीकडे राजकीय व्यभिचाराला समर्थन नाही, असे म्हणताना तुम्ही ज्यांनी वाया सुरत-गुवाहाटी करत अत्यंत कूटनीतीने आणि अक्षरशः खोक्यांचे राजकारण करत इथे सरकार बदलले, अशांना पाठिंबा देता. एकीकडे तुम्ही विचारांची भाषा करता आणि दुसरीकडे विचार बदलून टाकता. महाराष्ट्रातील जनता, जो कोणी संविधान प्रेमी आहे, त्याला ही भूमिका निश्चितपणे पटणारी नाही, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. 
 

Web Title: thackeray group sharad koli reaction over mns raj thackeray supported mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.