“२०२४साठी २१ मंदिरांचा वापर होईल, धर्म-देवळे-धार्मिक तणाव हीच भाजपची त्रिसूत्री, अफूच अफू…!”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 07:57 AM2023-08-02T07:57:47+5:302023-08-02T08:01:40+5:30
Thackeray Group Vs BJP Modi Govt: उद्धव ठाकरेंमुळे कोरोना रोखला गेला असे सांगताना, मंदिरांची उभारणी करुन भाजपने १४० कोटी लोकांच्या हाती फक्त ‘घंटा’ बडवण्याचे काम दिले, अशी टीका करण्यात आली.
Thackeray Group Vs BJP Modi Govt: अफूच्या गोळीने ना धर्माचे रक्षण होते, ना राष्ट्राचे संरक्षण होते. कोरोनाच्या संकटकाळात मंदिरे बंदच होती. डॉक्टर, परिचारिका हेच देवाच्या रूपात वावरत होते. थाळ्या वाजवून, घंटा बडवून कोरोना पळाला नाही. महाराष्ट्रात तो उद्धव ठाकरे यांच्या कार्यामुळे रोखला. गंगेत माणसांची प्रेते त्या काळात वाहताना जगाने पाहिली. तेथे धर्म होताच, पण विज्ञानाचा वापर झाला नाही व लोकांना गंगेत वाहत मरावे लागले. २०२४ साली पुन्हा एकदा धर्मांध अफूचेच पीक काढण्याची तयारी सुरू आहे. २१ मंदिरांचा वापर त्यासाठी होईल. भक्तांनी आता सावध राहावे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
देशात असंख्य प्रश्नांचे थैमान सुरू आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘धर्म-देवळे-धार्मिक तणाव’ याच त्रिसूत्रीतून भाजप निवडणुकांना सामोरा जाईल. धर्म ही अफूची गोळी आहे. त्या अफूचा अंमल देशाच्या नसांत पुरेपूर भिनला आहे. २०२४ हे धार्मिक वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेने त्याची सुरुवात होईल. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, महिलांना संरक्षण, प्रतिष्ठा देऊ न शकलेल्या सरकारने धर्माच्या नावाखाली अफूच्या गोळ्या दिल्या व त्याच नशेचा अंमल कायम राहावा म्हणून १३ हजार कोटी रुपये खर्च करून देशात २१ भव्य मंदिरांचे कॉरिडॉर उभारले जात आहेत. मंदिरांचा विकास केला हाच मोदींचा प्रचाराचा मुद्दा राहील. कारण तेच त्यांचे हिंदुत्व आहे. लोकांना घंटा बडवण्यात, पूजा-अभिषेक, महाआरत्यांत गुंतवून ठेवण्याची कला भाजपला साधली आहे व त्यासाठी बागेश्वर बाबा, मनोहरपंत भिडे, रामरहिम असे बाबा लोक त्यांनी हाताशी ठेवले आहेत, या शब्दांत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून हल्लाबोल केला आहे.
फक्त मंदिरांची उभारणी करून देशाची प्रगती होत नाही
फक्त मंदिरांची उभारणी करून देशाची प्रगती होत नाही. शिक्षण, उद्योग, विज्ञान, संरक्षण उत्पादन, कला, सामाजिक न्याय व सुधारणा यातही भारत देश अग्रेसर असावा. मंदिरे ही मनःशांतीसाठी आहेत. विज्ञान हे प्रगतीसाठी आहे. भारत सरकार २१ मंदिरांच्या विकासावर व धार्मिक कॉरिडॉरवर मोठय़ा प्रमाणात काम करीत आहे. त्यात विज्ञान नाही, असे ठाकरे गटाने सुनावले आहे. २०१४ च्या निवडणुकांआधी ही सर्व मंदिरे तयार होतील. २०१४ साली सत्तेवर येण्याआधी मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली. अनेक घोषणा मोदी सरकारने चुलीत घातल्या आहेत आणि २१ मंदिरांची उभारणी करून भाजपने १४० कोटी लोकांच्या हाती फक्त ‘घंटा’ बडवण्याचे काम दिले आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.
दरम्यान, देशात संरक्षण सामग्री बनत नाही. राफेलसारखी लढाऊ विमाने फ्रान्स-अमेरिकेकडून हजारो कोटींना विकत घ्यावी लागतात हे काही आत्मनिर्भरतेचे लक्षण नाही. देशात गोमांस, समान नागरी कायदा, लव्ह जिहाद, हनुमान चालिसा अशा विषयांवर धार्मिक तणाव निर्माण करायचे व त्या वातावरणाचा फायदा घेऊन निवडणुकांना सामोरे जायचे हे भाजपचे नित्याचेच धोरण. त्यात आता मंदिरांची भर पडली, या शब्दांत ठाकरे गटाने भाजप आणि केंद्रातील मोदी सरकावर टीकास्त्र सोडले.