Kasaba Bypoll Election Result 2023: “धनशक्तीवर जनशक्तीची मात, ओरिजिनल शिवसेनेची साथ सोडल्यामुळे भाजपने गड गमावला”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 03:44 PM2023-03-02T15:44:41+5:302023-03-02T15:46:00+5:30
खऱ्या शिवसेनेची साथ सोडल्यामुळे भाजपचा पराभव झाला, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
Kasaba Bypoll Election Result 2023: महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अनपेक्षित विजय झाला. कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावर भाष्य करताना, भाजपवर टीका केली आहे.
पैशांचा पाऊस थांबला आणि मतांचा पाऊस पडत आहे. जनतेने त्यांना स्वीकारले नाही. आशीर्वाद घेणे ही परंपरा आहे. त्यामुळे १०० टक्के गिरीश बापट यांना भेटायला जाणार आहे. ५० खोके एकदम ओके हे फक्त इथेच नाही तर महाराष्ट्रात दिसतेय. आणि हे परिवर्तन राज्यभर होणार आहे. शिवसेनेवर जो हल्ला केला, हे त्याचे उत्तर असल्याची प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली. यानंतर सुषमा अंधारे यांनी या विजयाबाबत आनंद व्यक्त केला आहे.
धनशक्तीवर जनशक्तीने केलेली मात
कसबा पेठ पोडनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा झालेला विजय ही धनशक्तीवर जनशक्तीने केलेली मात आहे. रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने महाविकास आघाडीला बुस्ट मिळाला आहे. यामध्ये एक महत्त्वाचे निरीक्षण असे की, भाजपसोबत जोपर्यंत ओरिजिनल म्हणजे खरी शिवसेना होती, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांच्यासोबत होते, तोपर्यंत कसबा येथे विजयाची खात्री होती. ज्या क्षणी खऱ्या शिवसेनेची साथ सोडली, तेव्हा खरी शिवसेना महाविकास आघाडीच्या बाजूने उभी राहिली. आता त्याची परिणिती रवींद्र धंगेकरांचा विजय आहे. रवींद्र धंगेकर हे सामान्य व्यक्ती आहेत. त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.
दरम्यान, रवींद्र धंगेकर यांच्यासाठी कसबा पेठ मतदारसंघात रोड शो घेणाऱ्या आदित्य ठाकरेंनीही या विजयानंतर आनंद व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरेंनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली. कसब्यातील विजयाचे वातावरण हे महाराष्ट्रात आणि देशात कायम राहील, असे त्यांनी म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"