Maharashtra Politics: “बागेश्वरबाबाची सिद्धी माझ्याकडे नाही”; गुलाबराव पाटलांच्या विधानावरुन सुषमा अंधारेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 07:09 PM2023-02-25T19:09:56+5:302023-02-25T19:10:55+5:30
Maharashtra News: कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपला पराभव स्पष्ट दिसत आहे, असा दावा सुषमा अंधारेंनी केला.
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एकामागून एक गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. खळबळजनक विधाने नेतेमंडळी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पहाटेच्या शपथविधीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका विधानावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. यातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बागेश्वर बाबाचा दाखला देत गुलाबराव पाटील आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.
गुलाबराव पाटील गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली. तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. यावरून सुषमा अंधारेंनी निशाणा साधला.
बागेश्वरबाबाची सिद्धी माझ्याकडे नाही
सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांना याच वक्तव्यावरून कात्रीत पकडले. गुलाबराव पाटील यापूर्वी खोटे बोलत होते असे समजावे का? आधी गुलाबराव म्हणत होते मी हिंदुत्व वाचवायला गेलो. मला साहेब भेटत नव्हते म्हणून गेलो. त्यामुळे ते आता खोटे बोलतायत की पहिले खोटे बोलत होते? त्यांना विचारले पाहिजे की, तुम्ही तेव्हाचे खरे होते की आताचे खरे आहेत? माझ्याकडे बागेश्वर बाबाची सिद्धी नाही त्यामुळे आता गुलाबराव पाटील असे का विधान करतात हे मी सांगू शकत नाही, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला.
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपाला पराभव स्पष्ट दिसतोय
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपाला पराभव स्पष्ट दिसत आहे. म्हणून देवेंद्र फडवणवीस यांनी अर्ध मंत्रिमंडळ पुण्यातील प्रचारात उतरवंलय. त्यानंतरही अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी आजारी गिरीश बापट यांनाही प्रचारात आणल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"