ठाकरेंना धडा शिकवायचा होता

By admin | Published: March 27, 2016 03:22 AM2016-03-27T03:22:53+5:302016-03-27T03:22:53+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना धडा शिकवायचा आहे, असे हाफिज सईदने मला सांगितले होते. त्या वेळी मी त्याला सहा महिन्यांत हे काम पूर्ण करतो, असे आश्वासन एलईटीला दिले

Thackeray had to teach the lesson | ठाकरेंना धडा शिकवायचा होता

ठाकरेंना धडा शिकवायचा होता

Next

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना धडा शिकवायचा आहे, असे हाफिज सईदने मला सांगितले होते. त्या वेळी मी त्याला सहा महिन्यांत हे काम पूर्ण करतो, असे आश्वासन एलईटीला दिले होते, असा गौप्यस्फोट अमेरिका - पाकिस्तानी एलईटी आॅपरेटिव्ह डेव्हिड हेडली याने शनिवारच्या उलटतपासणीवेळी केला. शिवाय आपण इशरत जहाँबद्दल एनआयएला माहिती दिली होती, मात्र त्यांनी ती जबाबात का घेतली नाही, हे कळत नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.
बाळासाहेबांच्या बंगल्याबाहेरील सुरक्षिततेची पाहणी केली होती, अशी कबुली उलटतपासणीच्या चौथ्या दिवशी हेडलीने दिली. ‘मातोश्री’बाहेरील एक-दोन सुरक्षारक्षकांबरोबर बोलल्याचेही त्याने या वेळी सांगितले. बाळासाहेबांच्या घरासह हेडलीने महाराष्ट्राचे विधान भवन आणि सीबीआयचे तन्ना हाउस येथीलही पाहणी केल्याचे कबूल केले.
‘२००९मध्ये दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेजची पाहणी केली. ती करीत असताना त्यात उपराष्ट्रपतींच्या बंगल्याचेही व्हिडीओ शूट झाले. उपराष्ट्रपतींचा बंगला आणि मुंबईतील इस्रायल दूतावास आपले ‘टार्गेट’ नव्हते,’ असेही हेडलीने स्पष्ट केले.
गुजरातमध्ये पोलिसांच्या चकमकीत हत्या झालेली १९ वर्षीय इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाची (एलईटी) आॅपरेटिव्ह होती आणि ती एलईटीच्या ‘बॉच-अप’ आॅपरेशनमध्ये सहभागी होती, या आपल्या भूमिकेवर हेडली ठाम राहिला. इशरत जहाँविषयीची माहिती राष्ट्रीय तपास पथकाला (एनआयए) २०१०मध्ये देऊनही त्यांनी ती नोंदवली नाही, असा खळबळजनक आरोप हेडलीने एनआयएवर केला. लख्वीने एलईटीचा आॅपरेटर मुझम्मिल बट याच्याशी माझी ओळख करून दिली. अक्षरधाम आणि गुजरात पोलीस नाका हल्ला (इशरत जहाँ) प्रकरण तोच हाताळत असल्याचे लख्वीने मला सांगितले; मात्र वर्तमानपत्रात मला याविषयी वाचून माहिती होती, असे हेडलीने अबू जुंदालचे वकील अ‍ॅड. वहाब खान उलटतपासणी घेत असताना सांगितले.
मुझम्मिल बट एलईटीचा टॉप कमांडर आहे, त्याची आतापर्यंत सगळी मोठी आॅपरेशन्स अपयशी ठरली आहेत, असे मला लख्वीने त्याची ओळख करून देताना सांगितले आहे. बट एलईटीचा टॉप कमांडर आहे, एवढेच लख्वीने मला सांगितले. एनआयएने अतिरिक्त वाक्य माझ्या तोंडात का घातले? हे मला माहीत नाही. पण त्यांनी मी दिलेल्या उतराप्रमाणे उत्तरे नोंदवली नाहीत. त्यांनी माझा जबाब जसाच्या तसा नोंदवला नाही. माझा जबाब नोंदवून झाल्यावर त्यांनी त्याची प्रतही मला दिली नाही किंवा वाचूनही दाखवला नाही, असे हेडलीने उलटतपासणीवेळी न्या. जी. ए. सानप यांना सांगितले.
एलईटीची महिला शाखा
एलईटीचे महिला पथक आहे का? असे विचारल्यावर हेडलीने एलईटीचे महिला पथक नसून महिला शाखा आहे, असे अ‍ॅड. खान यांना सांगितले. तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हेडलीच्या साक्षीमध्ये स्पष्टता यावी, यासाठी त्याला ही महिला शाखा ्रबॉम्बस्फोटाच्या कामात आहे का? अशी विचारणा हेडलीकडे केली. ‘महिला शाखा बॉम्बसाठी नसून महिलांचे शिक्षण देणे, धार्मिक शिक्षण देणे, विधवा महिलांना सांभाळणे असे सामाजिक कार्य करत असल्याची माहिती न्यायालयाला दिली.
साक्षीदाराच्या पुन्हा एकदा उलटतपासणीसाठी अर्ज करणार
न्यायालयाने वहाब खान यांचा अर्ज फेटाळल्यानंतर खान यांनी साक्षीदाराची उलटतपासणी घेण्यासाठी एक अर्ज करू. हा अर्ज फेटाळल्यास उच्च न्यायालयात जाऊ, असे प्रसारमाध्यामांच्या प्रतिनिधींना सांगितले. (प्रतिनिधी)

हेडलीची उलटतपासणी संपली...
सहा दिवस हेडलीची सरतपासणी सुरू होती. त्यात हेडलीने बरीच माहिती न्यायालयाला दिली. अबू जुंदाल याच्या वकिलांनी २३ मार्चपासून त्याची उलटतपासणी नोंदवण्यास सुरुवात केली. अखेरीस शनिवारी ती संपली. जुंदालचे वकील वहाब खान यांनी उलटतपासणीसाठी आणखी वेळ पाहिजे असल्याचे न्यायालयाला सांगितले. यामागे खान यांचा हेतू सरळ नसल्याचे म्हणत न्यायालयाने त्यांचा उलटतपासणीसाठी दिवस वाढवून देण्याचा अर्ज फेटाळला. अमेरिका सरकारने हेडलीच्या उलटतपासणीसाठी चार दिवस दिले होते. ही मुदत शनिवारी संपली. ती वाढवून देण्यासाठी खान यांनी न्यायालयात अर्ज केला. त्यावर विशेष सरकारी वकील यांनी आक्षेप घेतला.

इशरत लष्करची सदस्य : २०१०मध्ये एनआयएने हेडलीचा जबाब नोंदवला. त्या वेळी हेडलीने इशरतविषयी एनआयएला माहिती दिली होती. इशरत जहाँ एलईटीची सदस्य असून, ती भारतीय आहे. मुझम्मिल बटच्या हाताखाली काम करत होती, अशी माहिती हेडलीने एनआयएला दिली होती. मात्र याबाबत विचारताना अ‍ॅड. खान यांनी हेडलीने एनआयला इशरत जहाँची माहिती न दिल्याचा आरोप केला.

अमेरिका, भारत आणि इस्रायल इस्लामचे शत्रू मानत होतो...
२६/११च्या हल्ल्यापर्यंत हेडली अमेरिका, भारत आणि इस्रायलला इस्लामचा शत्रू मानत होता. तसेच २६/११चा हल्ला म्हणजे १९७१मध्ये इंडो-पाक युद्धामध्ये शाळेवर टाकण्यात आलेल्या बॉम्बचा बदला होता, असेही हेडलीने कबूल केले. ‘भारतावर इस्लामचे राज्य असावे, असे मला कधी वाटले नाही. माझे मिशन आणि विचारधारा काश्मीरच्या पुढे गेलीच नाही,’ असेही हेडलीने उलटतपासणीवेळी सांगितले.

Web Title: Thackeray had to teach the lesson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.