क्रीडा भवनच्या जागेवर ठाकरेंचे स्मारक?
By admin | Published: January 5, 2015 07:28 AM2015-01-05T07:28:00+5:302015-01-05T07:28:00+5:30
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथे उभारायचे स्मारक सध्या वीर सावरकर मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या क्रीडा भवनच्या जागेवर करण्याच्या हालचाली सुरू आहेत
संदीप प्रधान, मुंबई
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथे उभारायचे स्मारक सध्या वीर सावरकर मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या क्रीडा भवनच्या जागेवर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबई महापालिकेचे हे क्रीडा भवन नादुरुस्त असल्याचे सांगून दोन दिवसांपूर्वी ते बंद करण्यात आले आहे.
महापालिकेच्या क्रीडा भवनचा हा भूखंड ३१०८ चौ.मी. क्षेत्रफळाचा असून, प्रत्यक्ष वापराकरिता २७७९.८५ चौ.मी. भूखंड उपलब्ध होऊ शकतो. या ठिकाणी ६१० चौ.मी. क्षेत्रावर टेनिस कोर्ट होते. याखेरीज बॅडमिंटन, कॅरम, पत्ते खेळण्याची सोय होती. शिवाजी पार्क परिसरातील काही मंडळी व विशेषकरून मध्यमवर्गीय कुटुंबातील क्रीडापटू या क्रीडा भवनचा वापर करीत होते. दोन दिवसांपूर्वी दुरुस्तीकरिता ही वास्तू अचानक बंद केली. प्रत्यक्षात या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा सुरू आहे. २३ जानेवारीस बाळासाहेबांची जयंती असून, त्यावेळी याबाबतची घोषणा अपेक्षित आहे. शिवसेनाप्रमुखांवर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे तेथे शिवसैनिकांना माथा टेकून दर्शन घेण्याकरिता चौथरा उभा केला आहे. मात्र शिवसेनाप्रमुखांची छायाचित्रे, वापरातील वस्तू, त्यांची गाजलेली भाषणे वगैरेचे प्रदर्शन उभारण्याकरिता स्मारकापासून हाकेच्या अंतरावर क्रीडा भवनचीच जागा सोयीची आहे. याच रस्त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर व संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्म्यांची महती सांगणाऱ्या वास्तू आहेत.
याबाबत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांना विचारले असता ते म्हणाले, की क्रीडा भवनच्या जागेवर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभे करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. बाळासाहेबांच्या स्मारकाकरिता ३ ते ४ जागांचा विचार सुरू आहे. त्यामध्ये या जागेचा समावेश निश्चित आहे. शिवाजी पार्क परिसरात क्रीडा भवनच्या जागेखेरीज दुसरी जागा उपलब्ध आहे का, असे विचारले असता या परिसरात दुसरी जागा नाही, असे शेवाळे यांनी स्पष्ट केले.