ठाकरे स्मारकाचे आज लोकार्पण
By admin | Published: January 7, 2017 03:56 AM2017-01-07T03:56:26+5:302017-01-07T03:56:26+5:30
काळातलाव येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा लोकार्पण कार्यक्रम आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला
कल्याण : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने काळातलाव येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा लोकार्पण कार्यक्रम आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला होता. परंतु, स्मारकाच्या लोकार्पणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे ठरलेल्या दिवशी शनिवारी सायंकाळी ५ वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण होणार आहे.
बाळासाहेबांच्या स्मारकाच्या लोकार्पणासाठी आधी ८ जानेवारीची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार, ७ जानेवारीची तारीख ठरवली. परंतु, बुधवारी सायंकाळीच कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला होता. त्यावर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता ही सार्वत्रिक निवडणुकीची नाही तसेच स्मारक लोकार्पण या कार्यक्रमाचा या निवडणुकीवर कोणताही प्रभाव पडणार नाही. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम पूर्वनियोजित सरकारी कार्यक्रम असल्यामुळे निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाला विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी गुरुवारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. त्याची दखल घेत आयोगाने कार्यक्रमाला सशर्त परवानगी दिली. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
।महापौरांनी मानले आभार
स्मारकाच्या लोकार्पणासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल महापौर राजेंद्र देवळेकर यांनी शिवसेनेचे खासदार व पक्षाचे सचिव अनिल देसाई आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर त्यांनी निवडणूक आयोगालाही धन्यवाद दिले आहेत.
आयोगाच्या अटी : आयोगाने परवानगी देताना ती सशर्त दिली आहे. या कार्यक्रमात मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही घोषणा करू नये. राजकीय नेते आणि मंत्र्यांनीदेखील याची काळजी घ्यावी तसेच निवडणुकीशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही, अशा अटी आयोगाने घातल्या आहेत.
पुतळ्यालाही मिळाली परवानगी
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ््याला गृहमंत्रालयानेही परवानगी दिली आहे. त्यासंबंधीचे पत्रही त्यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. मनसेने स्मारकाची पाहणी केली असताना पुतळ््याला परवानगी नसल्याची बाब उघडकीस आली होती. त्यावर केडीएमसीचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी दोन दिवसांत पुतळ््याला परवानगी मिळेल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळ््याची पाहणी केली होती.