Thackeray Movie: धमकी देण्याची शिवसेनेची हिंमतच कशी होते?- अंजली दमानिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 10:45 PM2018-12-27T22:45:03+5:302018-12-27T22:47:57+5:30
२५ जानेवारीला 'ठाकरे' शिवाय अन्य चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची धमकी शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेच्या अधिकाऱ्यानं दिली होती.
मुंबई: ठाकरे चित्रपट प्रदर्शित होईल, त्या दिवशी इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरेंनी दिला होता. यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शिवसेना आणि भाजपावर कडाडून टीका केली आहे. 'धमकी देण्याची शिवसेनेची हिंमत होतेच कशी? राज्यात गुंडांचं राज्य आहे का?' असे प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केले. अशा धमक्या देणाऱ्यांना तुरुंगात टाकायला हवं, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
@Dev_Fadnavis@MumbaiPolice@CPMumbaiPolice@MahaDGIPR I need your response. Will the Home Department and my Maharashtra Police not take action on such dhamki? Is this goonda raj?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 27, 2018
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेचे सरचिटणीस असलेल्या बाळा लोकरेंनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. 'ठाकरे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या तारखेला अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही,' असं लोकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलं. यासोबतच एका वृत्तवाहिनीशी बोलताना, या दिवशी दुसरा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यास शिवसेना स्टाइलनं उत्तर देऊ, असा इशारादेखील दिला. यावरुन वाद निर्माण होताच शिवसेना खासदार आणि चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. ते लोकरे यांचं वैयक्तिक मत असून ती शिवसेनेची भूमिका नाही, असं राऊत म्हणाले.
Release of 2 more films will be clashing with it. Kangana Ranaut-starrer, Manikarnika: The Queen Of Jhansi and Emraan Hashmi led Cheat India. Who the hell is Bala Lokare? He may be Gen Sec of Shiv Sena’s film wing. Warn him of dire consequences of he dares to do such nonsense
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 27, 2018
संजय राऊत यांच्या स्पष्टीकरणानंतरदेखील हा वाद शमलेला नाही. अंजली दमानियांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे कारवाईची मागणी केली आहे. गृह मंत्रालय, महाराष्ट्र पोलीस या प्रकरणी कारवाई करणार का? राज्यात गुंडांचं राज्य आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. 'ठाकरे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. याच दिवशी कंगना रानौतचा मणिकर्णिका आणि इम्रान हाश्मीचा चीट इंडियादेखील प्रदर्शित होणार आहे. त्या दिवशी इतर कोणतेही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी देणारा लोकरे कोण? ' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.