आरोप करणा-यांना बांधील नाही, राजकारण करण्याचा नीचपणा करणार नाही - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 05:17 PM2017-08-30T17:17:03+5:302017-08-30T17:34:36+5:30

नालेसफाईत महापालिकेकडून कुठलाही गलथानपणा झालेला नाही. मुंबईत योग्य पद्धतीने नालेसफाई झाली आहे.

Thackeray is not bound, will not do it for politics - Uddhav Thackeray | आरोप करणा-यांना बांधील नाही, राजकारण करण्याचा नीचपणा करणार नाही - उद्धव ठाकरे

आरोप करणा-यांना बांधील नाही, राजकारण करण्याचा नीचपणा करणार नाही - उद्धव ठाकरे

Next

मुंबई, दि. 30 - नालेसफाईत महापालिकेकडून कुठलाही गलथानपणा झालेला नाही. मुंबईत योग्य पद्धतीने नालेसफाई झाली आहे. कोटयावधी रुपये योग्य पद्धतीने खर्च झाले नसते तर, मुंबईतून पाण्याचा निचरा झाला नसता असे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. मी ख-या मुंबईकरांना बांधील आहे. आरोप करणा-यांना मी बांधील नाही, कालच्या घटनेचे राजकारण करण्याचा नीचपणा करणार नाही असे उद्धव म्हणाले.  
आरोप करणा-यांनी मुंबईत काल काय केले याची शहानिशा करा. शिवसेनेचे आमदार, महापौरांनी रस्त्यावर उतरुन काम केले असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. मंगळवारी मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर काहीवेळात मुंबापुरीची तुंबापुरी झाली. लोकांचे अक्षरक्ष हाल झाले. नेहमी धावणा-या मुंबईला ब्रेक लागला. या सर्व परिस्थितीसाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला जबाबदार धरण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. 

मुंबईत 29 ऑगस्टला झालेल्या पावसाची 26 जुलैच्या पावसाबरोबर तुलना करत असाल तर, निश्चितच मुंबईत 26 जुलैसारखी परिस्थिती नव्हती. महापालिकेने चांगल्या पद्धतीने काम केले असे उद्धव यांनी सांगितले. मुसळधार पावसाचा अंदाज असला तरी, अतिवृष्टी होईल असे वाटले नव्हते. मुंबईत पंपिंग स्टेशन्समधून सहा ते आठ हजार दशलक्ष लीटर पाणी बाहेर काढलं असे उद्धव म्हणाले. पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाताना एका क्षणाला उद्धव यांनी जनतेची सेवा करतो म्हणून जनतेने वारंवार आशिर्वाद दिला आहे असे सांगितले. मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण झाल्याने मिठी नदीत पूर आला नाही असे महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी सांगितले. निर्सगाशी एका मर्यादेपर्यंत लढू शकतो असे उद्धव म्हणाले. 

काल मुंबईत भरपूर पाऊस झालाय हे आजच्या मुंबईकडे पाहून वाटत नाही. महापालिका, बीईएसटी कर्मचारी आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरुन जनतेची मदत करत होते असे उद्धव यांनी सांगितले. पावसानंतर आता रस्त्यांवर कचरा असून, रोगराई निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक निर्णय घेण्यात आले आहेत. शिवसेना मुंबईकरांसाठी उद्यापासून आरोग्य शिबिर सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मंगळवारी मुंबईच्या आकाशात 9 किलोमीटर उंचीचा ढग होता, सुदैवाने ढग फुटी झाली नाही अन्यथा काय परिस्थिती उदभवली असती याची कल्पनाही करता येत नाही असे उद्धव म्हणाले. मंगळवारी संपूर्ण मुंबईत 325 मिमी पाऊस झाला, 26 ठिकाणी एका तासात 50 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. 3 ते 5 या वेळेत 60 टक्के पाऊस झाला अशी माहिती महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली. 

Web Title: Thackeray is not bound, will not do it for politics - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.