ठाकरेच की पुन्हा फडणवीस? राजकीय भूकंपानंतर अवघ्या देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे, घराघरात एकच चर्चा आता काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 08:15 AM2022-06-22T08:15:14+5:302022-06-22T08:15:57+5:30

Eknath Shinde: विधानपरिषद निवडणुकीत फडणवीस यांनी सोमवारी महाविकास आघाडीला केलेली जखम ओली असतानाच शिंदे सुरतमध्ये समर्थकांसह पोहोचले असल्याचे वृत्त मंगळवारी सकाळीच धडकले. एकच खळबळ उडाली. दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला.

Thackeray or Fadnavis again? After the political earthquake, the focus of the country is on Maharashtra | ठाकरेच की पुन्हा फडणवीस? राजकीय भूकंपानंतर अवघ्या देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे, घराघरात एकच चर्चा आता काय होणार?

ठाकरेच की पुन्हा फडणवीस? राजकीय भूकंपानंतर अवघ्या देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे, घराघरात एकच चर्चा आता काय होणार?

googlenewsNext

मुंबई :  विधानपरिषद निवडणुकीत फडणवीस यांनी सोमवारी महाविकास आघाडीला केलेली जखम ओली असतानाच शिंदे सुरतमध्ये समर्थकांसह पोहोचले असल्याचे वृत्त मंगळवारी सकाळीच धडकले. एकच खळबळ उडाली. दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला. सुरतमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचलेले नार्वेकर यांनी शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले. मात्र आपली अट मान्य करा या भूमिकेवर शिंदे ठाम राहिल्याची माहिती आहे.
निष्ठांवत शिवसैनिक असलेल्या शिंदेंच्या बंडाने शिवसेनेला हादरा बसला.  शिंदेंसोबत ३० हून अधिक आमदार असल्याच्या वृत्ताने सरकारवरील संकट गहिरे होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक होत आहे. सरकार स्थिर असल्याचा दावा तिन्ही पक्षांनी केला आहे.

भाजपसोबत न जाण्यावरमुख्यमंत्री ठाकरे ठाम
आपण भाजपसोबत आधी पाच वर्षे सत्तेत होतो. त्यावेळी त्यांनी आपल्याला किती त्रास दिला. आज आपले सरकार आहे तरी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्रास सुरूच आहे, अशावेळी भाजपसोबत कशाला जायचे, अस्मिता महत्त्वाची नाही का, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर घेतलेल्या आमदार, खासदारांच्या बैठकीत घातली. शिंदे यांचा प्रस्ताव स्वीकारायचा नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. शिंदे लवकरच आपल्यात परत येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच बैठकीत एक विद्यमान आणि एका माजी मंत्र्यांनी शिंदे यांच्या प्रस्तावावर विचार करावा अशी गळ ठाकरे यांना घातल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी केली चर्चा; दूतांची शिष्टाई निष्फळ
उद्धव ठाकरेंचे दूत म्हणून शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर व आ.रवींद्र फाटक यांनी सुरतला जावून शिंदे यांच्याशी चर्चा केली.परत या, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा, असे साकडे घातले पण शिंदे यांनी त्यास साफ नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मुंबईत या, भेटून बोलू असे ठाकरे म्हणाले पण शिंदे यांनी आधी अटी मान्य करा मग बघू असे सांगिल्याचे समजते.

शरद पवार यांची पक्ष सहकाऱ्यांशी चर्चा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रात्री दिल्लीहून परतल्यानंतर सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते खा.प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली.

शिंदेंना हटविले, चौधरींना संधी
शिवसेनेच्या विधानसभेतील गटनेते पदावरून शिंदे यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी हटविले आहे. तसे पत्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना देण्यात येणार आहे. मुंबईतील शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदारांचा गुंगारा, गुप्तचर यंत्रणेचे अपयश
एकनाथ शिंदे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी सोमवारी विधानभवनात आले. मतदानानंतर ते निघाले. त्यांच्या पाठोपाठ समर्थक आमदारांच्या गाड्या एकेक करून निघाल्या. या हालचालींची राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला कल्पना आली नाही का, मुख्यमंत्र्यांना त्यांनी माहिती दिली नाही का, मंत्र्यांना पोलिसांची सुरक्षा असते, गुजरातच्या सीमेपर्यंत पोलीस त्यांच्यासोबत होते,तरीही मंत्री, आमदारांच्या हालचालींची माहिती वर्षावर कशी दिली गेली नाही असे प्रश्न निर्माण झाले आहेत. 

असे घडले नाट्य...
पहाटे ३:३० 
एकनाश शिंदे यांची बंडाळी आणि आमदारांच्या सुरतवारीने ‘वर्षा’ निवासस्थानावरील वर्दळ वाढली.
सकाळी ११
‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेना नेत्यांना पाचारण
n ‘रॉयल स्टोन’ या शासकीय निवासस्थानी काँग्रेस आमदारांची तातडीची बैठक
११:३०
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीला सुरुवात
दुपारी १२ 
शिवसेना आमदार, नेत्यांची ‘वर्षा’वर बैठक.
२:००
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद
n राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत पत्रकार परिषद
n शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक सुरतच्या दिशेने रवाना
३:००
राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसकडून कमलनाथ यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती 
सायं. ५:०० 
मिलिंद नार्वेकर आणि फाटक सुरतमध्ये दाखल
६:००
शिंदे यांच्यासोबतची बैठक संपवून नार्वेकर-फाटक मुंबईकडे रवाना
n ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची बैठक 
रात्री ८:००
शरद पवार दिल्लीहून मुंबईत दाखल 
८:३०  
प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक

Web Title: Thackeray or Fadnavis again? After the political earthquake, the focus of the country is on Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.