घटक पक्षांना मंत्रीपदे देण्यास ठाकरे-पवार सकारात्मक ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 12:34 PM2019-12-26T12:34:01+5:302019-12-26T12:34:21+5:30
बच्चू कडू, जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीसोबत राहिलेल्या घटक पक्षांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे घटक पक्षांच्या मंत्रीपदांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाआघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, प्रहार संघटना आणि शेतकरी कामगार पक्षांनी साथ दिली. त्यामुळे या पक्षांच्या नेत्यांना मंत्रीपद मिळण्याचा संभव आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला अनुकूल वातावरण होते. त्या परिस्थितीत देखील हे घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिशी राहिले होते.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला राज्यातील सत्ता मिळविण्याचा मार्ग सुकर झाला असल्याचे सांगण्यात येत होते. मत चाचण्यांमध्येही ते दाखविण्यात आले होते. त्यामुळे महाआघाडीला पुन्हा एकदा विरोधात बसावे लागणार अशी स्थिती होती. तरी देखील घटक पक्षांनी आघाडीची साथ सोडली नाही. त्यांनी भाजपविरुद्ध एकवटून लढा दिला.
पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी आघाडीला दोन्ही निवडणुकीत विनाअट पाठिंबा दर्शविला होता. तर भाजपने अजित पवारांच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर देखील बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शविला होता. तर राजू शेट्टी देखील शेतकरी प्रश्नी आघाडीत सामील झाले होते. शेकापमुळे आघाडीला अनेक जागांवर फायदाच झाला. या घटक पक्षांनी अडचणीच्या काळातही आघाडीची साथ सोडली नाही. त्यामुळे त्यांना याचे फळ मिळण्याची शक्यता असून बच्चू कडू, जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.