जीमवरून ठाकरे-राणे जुंपली
By admin | Published: July 19, 2015 03:28 AM2015-07-19T03:28:42+5:302015-07-19T03:28:42+5:30
मरिन ड्राइव्ह येथील खुल्या व्यायामशाळेला महापालिकेची परवानगी नसल्याचे उजेडात आल्याने ती बेकायदा असल्याचा आरोप होऊ लागला आहे़ मात्र या व्यायामशाळेची संकल्पना
मुंबई : मरिन ड्राइव्ह येथील खुल्या व्यायामशाळेला महापालिकेची परवानगी नसल्याचे उजेडात आल्याने ती बेकायदा असल्याचा आरोप होऊ लागला आहे़ मात्र या व्यायामशाळेची संकल्पना थेट युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची असल्याने आता शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे़ त्यामुळे हिंमत असेल तर हात लावा, असे आव्हान शिवसेनेने दिले आहे़ मात्र काँग्रेस नेत्यांनीही त्यास प्रत्युत्तर देत वेळ आणि दिवस सांगून जीम काढायला येऊ, चिंता नको असे म्हणत शिवसेनेला डिवचले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावरील खुली व्यायामशाळा सी विभागाच्या कामगारांनी १६ जुलै रोजी उचलली़ या व्यायामशाळेचे उद्घाटन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले असल्याने वेगाने चक्र फिरली आणि तासाभरातच व्यायामशाळा जागेवर आली़ याप्रकरणी सी विभागाच्या साहाय्यक आयुक्तांवर कारवाई करण्याचा दबाव शिवसेनेकडून वाढला़ मात्र या व्यायामशाळेला ए विभाग कार्यालयाची परवानगी असली तरी सी विभागाची नव्हती, असे साहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांनी स्पष्टीकरण दिल्याने एकच खळबळ उडाली़ हाच मुद्दा उचलून धरीत विरोधी पक्षांनी शिवसेनेला अडचणीत आणण्याचे मनसुबे आखले आहेत़ काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आयुक्तांची भेट घेऊन ही व्यायामशाळा हटविण्याची मागणी केली होती़ त्यामुळे शिवसेनेच्या शिलेदारांनी मोठे-मोठे होर्डिंग्ज लावून जिमला हात लावून दाखवा, असे आव्हान दिले आहे़ पालिकेच्या पत्रव्यवहारावरुन बेकायदा ठरत असलेली ही व्यायामशाळा वाचविण्यासाठी शिवसेनेचे शिलेदार रस्त्यावर उतरल्याने व्यायामशाळेचा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत़
सोशल मीडियावरून जीरम वॉर
प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांना प्रत्युत्तर देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे़ यापूर्वी एलईडी दिव्यांचा वाद शिवसेना आणि भाजपामध्ये रंगला होता़ त्यानंतर आता खुल्या व्यायामशाळेचा वाद रंगात आला आहे़ युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे टिष्ट्वटरच्या माध्यमातूनच आपले मत प्रदर्शन करीत असल्याने काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावरून वेळ आणि दिवस सांगून जीम काढायला येऊ, चिंता नको, असे खोचक प्रत्युत्तर दिले आहे़
शिवसेनेचे आव्हान
‘हिंमत असेल तर ओपन जीमला हात लावून दाखवा!’, असे होर्डिंग लावत शिवसेनेने जीमविरोधात बोलणाऱ्यांना आव्हान दिले आहे़ याद राखा, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, असा सज्जड दम देत शिवसेनेचे शिलेदार मरिन ड्राइव्ह येथील पोलीस जीमखान्याजवळील या जीमच्या संरक्षणाची जबाबदारी उचलली आहे़
राणे इन अॅक्शन
लोकसभा, विधानसभा अशा सर्वच निवडणुकांमधून हद्दपार झालेले काँग्रेसचे नारायण राणे यांचा राजकारणातील दबदबा कमी झाल्याचे बोलले जात आहे़ राणे कुटुंबाचे वजन कायम राहण्यासाठी अशा आंदोलनाची त्यांना गरज आहे़ म्हणूनच हा मुद्दा नितेश राणे यांनी उचलून धरल्याचे काँग्रेसच्या गोटातून बोलले जात आहे़