ठाकरे-राणे समर्थक भिडले, राजकोट किल्ल्याचे नुकसान, दगडी चिरे निखळले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 03:46 PM2024-08-28T15:46:00+5:302024-08-28T15:47:01+5:30
Rajkot Fort : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यात प्रवेश करताच नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले.
राजकोट : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यात सर्वसामान्य जनतेने प्रचंड संताप व्यक्त केला. तसंच, याच घटनेवरून आज राजकोट किल्ल्यावर जोरदार राजकीय राडा पाहायला मिळाला.
घटनेची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते. मात्र, यादरम्यान भाजपाचे खासदार नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील आपल्या समर्थकांसह किल्ल्यावर पोहोचले. यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यात प्रवेश करताच नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले. तसेच, बघता बघता ठाकरे आणि राणे समर्थकांमधील शाब्दिक चकमक थेट धक्काबुक्की आणि हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचली. जवळपास तासभर चाललेल्या या राड्यात दोन्ही गटाचे अनेक कार्यकर्ते आणि काही पोलीस जखमी झाल्याचेही सांगण्यात आले. मात्र, या राजकीय राड्यामुळे राजकोट किल्ल्याचे दुर्दैवाने मोठे नुकसान झाले आहे. या राड्यात किल्ल्याच्या तटबंदीचे काही दगडी चिरे निखळले आहेत. त्यामुळे शिवभक्तांकडून या घटनेचा तीव्र संताप उमटतांना आता दिसत आहे.
नेमकं घडलं काय?
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहेत. या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून आज राजकोट किल्ल्यावर मोर्चा आयोजित करण्यात आल्याने आदित्य ठाकरे हे घटनास्थळी पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक होते. पाहणी करत असतानाच भाजप खासदार नारायण राणे आणि निलेश राणे आपल्या समर्थकांसह किल्ल्यावर आले. त्यानंतर याठिकाणी मोठा राडा झाला. दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांच्या आंगावर धावून गेले.