ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, उद्धव ठाकरेंचे बंडखोरी करणाऱ्यांना थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 06:46 AM2022-06-25T06:46:23+5:302022-06-25T06:49:11+5:30

Uddhav Thackeray: ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा असे थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना दिले आहे.

Thackeray, Shiv Sena live without using the name, Uddhav Thackeray's direct challenge to the rebels | ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, उद्धव ठाकरेंचे बंडखोरी करणाऱ्यांना थेट आव्हान

ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, उद्धव ठाकरेंचे बंडखोरी करणाऱ्यांना थेट आव्हान

googlenewsNext

मुंबई : ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा असे थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना दिले आहे. काही जण म्हणत होते की मेलो तरी शिवसेना सोडणार नाही. आज तेच पळून गेले. मला या सगळ्या आरोपांचा वीट आला आहे. ही वीट ठेवून चालणार नाही. तर अशा लोकांच्या डोक्यावर हाणणार आहे असा इशाराही त्यांनी दिला.

ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुखांशी ऑनलाइन संवाद साधला. बंडखोर आमदारांसंदर्भात ते म्हणाले की, तुम्हाला हवे आहेत तितके आमदार घेऊन जा. पण जोपर्यंत बाळासाहेबांनी रुजवलेली मुळे आहेत तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. जे सोडून गेले ते माझे कधीच नव्हते. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे. ज्यांना आपण मोठे केले त्यांची स्वप्ने मोठी झाली. ती मी पूर्ण करू शकत नाही. त्यांनी जावे.

सध्या जे चालले आहे तो भाजपचा डाव आहे. मी वर्षा निवासस्थान सोडले म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातही या पदावर जाईन असा कधी विचार केला नव्हता. त्या पदाचा कधीच मोह मला नव्हता. एकनाथ शिंदेंसोबत काही आमदार गुजरातला गेल्यानंतर काही आमदारांना बोलाविण्यात आले होते. यावेळी काही झाले तरी सोडणार नाही असे ते म्हणाले. दादा भुसे, संजय राठोड शब्द देऊनही निघून गेले. अशा लोकांचे करायचे काय अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केली.

भाजपासोबत जावे यासाठी माझ्यावर काही आमदारांचा दबाव आहे. माझ्या कुटुंबावर, मातोश्रीवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मी कधीच बसणार नाही. मी शांत आहे पण षंढ नाही, असेही ते म्हणाले.

आता आदित्यही बडवा आहे का?
आपण प्रत्येक वेळी यांना महत्त्वाची खाती दिली. नगरविकास नेहमी मुख्यमंत्र्यांकडे असते पण ते मी यांना दिले. माझ्याकडे साधीच खाती ठेवली. आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते आणि मी बडवा होतो. आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे का? यांच्या मुलाला खासदार केले मग माझ्या मुलाने काहीच करायचे नाही का?  
    - उद्धव ठाकरे

पक्षप्रमुखपदही सोडायला तयार म्हणत झाले भावुक...
जो कोणी समोर येईल त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. शिवसेनेचा पहिला नारळ फुटला होता तशीच परिस्थिती आहे असे समजा, असे आवाहनही त्यांनी केले. तुम्हाला जिथे भवितव्य दिसत असेल तिथे खुशाल जा मी थांबवणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर सांगा मी आनंदाने शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार असल्याचे सांगताना ते भावुक झाले.

स्वत:ची किंमत लावून गेले त्यांना किती किंमत द्यावी?
स्वत:ची किंमत लावून तिकडे गेलेल्यांना किती किंमत द्यायची अशी बोचरी टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर केली. मित्रपक्षांनी धोका दिला नाही पण आम्ही ज्यांना मोठे केले त्यांनी धोका दिला. शिवसेना पक्षप्रमुखांना कोरोना असताना त्यांनी धोका दिला. आयपीएलचे ऑक्शन होते तसे यांचे तिकडे झाले की काय असा सवालही आदित्य यांनी केला.

Web Title: Thackeray, Shiv Sena live without using the name, Uddhav Thackeray's direct challenge to the rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.