सार्वजनिक उपद्रवाबद्दल ठाकरेंवर गुन्हा नोंदवावा, उच्च न्यायालयात जनहित याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:46 AM2022-06-29T11:46:10+5:302022-06-29T11:46:41+5:30
एकनाथ शिंदे व अन्य बंडखोर नेत्यांवरून पत्रकार परिषदा, दौरे व राज्यातील ठिकठिकाणी भेटी देण्यास ठाकरे व राऊत यांना मनाई करावी, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी दाखल केली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी सार्वजनिक उपद्रव केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा व या प्रकरणाचा तपास करण्यात यावा, अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे व अन्य बंडखोर नेत्यांवरून पत्रकार परिषदा, दौरे व राज्यातील ठिकठिकाणी भेटी देण्यास ठाकरे व राऊत यांना मनाई करावी, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी दाखल केली आहे. राजकीय पेचप्रसंगांनंतर ठाकरे व राऊत यांनी धमक्या दिल्यानंतर बंडखोर नेते सुरक्षिततेसाठी गुवाहाटीला पळून गेले, असे पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे. बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यातील विविध जिल्ह्यांत शिवसैनिकांनी निदर्शने करण्यास सुरुवात केल्याने सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला, असा आरोप केला आहे.
पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे की, राज्यात दंगल आणि हिंसाचाराची परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. ठाकरे व राऊत यांच्या दबावामुळे आणि चिथावणीमुळे राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पोलिसांच्या उपस्थितीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग करण्यात आला. केंद्र सरकारने बंडखोर आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. याचाच अर्थ, राज्यात शांततेचा भंग झाला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून गुन्हा नोंदविण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना द्यावेत, अशीही मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.