ठाकरे-तावडेंची जुगलबंदी
By admin | Published: August 31, 2015 01:33 AM2015-08-31T01:33:45+5:302015-08-31T01:33:45+5:30
काशिमिरा येथील नाट्यगृहाच्या भूमीपूजन समारंभात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.
भार्इंदर : काशिमिरा येथील नाट्यगृहाच्या भूमीपूजन समारंभात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. ‘जहाँ कम, वहा हम’ या तावडे यांच्या फिल्मी डायलॉगवर ‘जहाँ कम वहा हम, देखते आपमे कितना है दम’असे फिल्मी प्रत्युत्तर ठाकरे यांनी दिले. मात्र त्यानंतर लगेचच ‘राजकीय नाटके नेहमीच होत असतात ती आता पुरे झाली, जनतेच्या विकासाकरिता एकत्र येऊ’, अशी सारवासारवही केली.
ठाकरे यांनी भाषणात सुरुवातीला ज्यांना स्वागताची संधी मिळाली नाही, त्यांची माफी मागितली. कार्यक्रमाला सर्व पक्षांच्या मंडळींनी हजेरी लावल्याने हे राजकीय नाटक तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करुन ठाकरे यांनी सांस्कृतिक विकासात महाराष्ट्र व बंगाल अग्रेसर असून महाराष्ट्रातील रंगभूमीचा विकास कायम लक्षात ठेवण्यासाठी त्याचा उलगडा करणारे दालन उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
केवळ भूमीपुजन करून नाट्यगृह उभारणीत अडचणी येता कामा नये, लवकरच त्याचे उद्घाटन व्हायला पाहिजे, असे ठाकरी शैलीत पालिका प्रशासनाला ऐकवले. तर तावडे यांनी या नाट्यगृहाचा वापर राजकीय ऐवजी नाटकांसाठीच झाला पाहिजे, असे सांगितले. व्यावसायिक नाटकांऐवजी प्रायोगिक नाटके अधिकाधिक होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
महापौर गीता जैन यांनी या नाट्यगृहाला स्व. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महापौरांनी केल्यानंतर त्याला आ. मुझफ्फर यांनी पाठींबा दिला. (प्रतिनिधी)