ठाकरे, वायकर यांची ९०० कोटींची जमीन खरेदी-निरुपम
By admin | Published: August 3, 2016 05:58 AM2016-08-03T05:58:10+5:302016-08-03T05:58:10+5:30
गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या भ्रष्टाचाराला पाठिशी घातले जात असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
मुंबई : ठाकरे कुटुंबाशी असणाऱ्या व्यावसायिक संबंधांमुळेच गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या भ्रष्टाचाराला पाठिशी घातले जात असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. ठाकरे आणि वायकर कुटुंबियांनी रायगड जिल्ह्यात सुमारे ९०० कोटी रुपयांची जमीन खरेदी केल्याचा खळबळजनक आरोपही निरुपम यांनी केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील कोलई गावात जमीन खरेदी करण्यात आली आहे. २५ एकराच्या या जमिनीच्या सातबाऱ्यावर रश्मी ठाकरे यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असल्याचे निरुपम म्हणाले. याशिवाय साडेसहा लाख चौरस फुटांच्या जमिनीचीही खरेदी करण्यात आली असून त्याची किंमत ९०० कोटी रुपये असल्याचा दावा निरुपम यांनी केला.
‘विजलक्ष्मी इन्फ्राकॉन’ या कंपनीत रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरे यांचे मामा दिलीप श्रृंगारपुरे संचालक आहेत. या कंपनीच्या माध्यमातून झोपु योजना राबविण्यात येतात. या कंपनीच्या जोगेश्वरी गुंफेजवळील प्रकल्पात पुरातत्त्व खात्याच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोपही निरुपम यांनी केला.
संजय निरुपम यांनी यापूर्वीही वायकरांना लक्ष्य केले होते. वायकर यांनी आपल्या मतदारसंघात अनेक झोपु योजना राबविल्या आहेत. त्यात अनियमितता असल्याचा आरोप निरुपम यांनी केला होता. शिवाय, वायकर यांच्या कुटुंबियांशी संबंधित ट्रस्टने व्यायामशाळेच्या नावाखाली आरे कॉलनीतील २० एकर जमीन लाटल्याचाही आरोप त्यांनी केला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात वायकर यांना क्लीन चिट दिली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या क्लीन चीटवरही निरुपम यांनी आक्षेप घेतला. झोपु योजना राबविणाऱ्या कंपनीचा राजीनामा दिल्याचा दावा वायकर यांनी केला आहे. मग, राजीनाम्यानंतर त्या कंपनीच्या बैठकांना वायकर का हजेरी लावतात? असा सवालही निरुपम यांनी केला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ‘मातोश्री’ला भेट देत भोजन घेतले होते. तेव्हाच उद्धव ठाकरे यांनी वायकरांना क्लीन चीट देण्यास सांगितल्याचा दावाही निरुपम यांनी केला. (प्रतिनिधी)
तर निरुपम यांना दलाली
रायगड येथे खरेदी केलेल्या जमिनीची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात आधीच जाहीर केलेली आहे. त्यात लपविण्यासारखे काहीच नाही. ज्या गोष्टी मी स्वत:च आधी जाहीर केलेल्या आहेत, त्याच निरुपम सांगत असतील तर त्याला काहीही अर्थ नाही. मुळात निरुपम जमिनीच्या किंमतीचे जे आकडे सांगत आहेत ते चुकीचे आहेत. ती जमीन ९०० कोटींची आहे, असा निरुपमांचा दावा असेल तर त्यांना त्याची दलाली द्यायला मी तयार आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र वायकर यांनी निरुपम यांच्या आरोपांवर उत्तर देताना दिली. शिवाय या जमिनीतील ठाकरे कुटुंबियांच्या भागीदाराबाबत बोलताना ‘यात चुकीचे काय आहे’ असा सवाल वायकर यांनी केला. (प्रतिनिधी)