ठाकरेंचा आरोप म्हणजे वडाची साल पिंपळाला
By Admin | Published: May 17, 2017 02:24 AM2017-05-17T02:24:41+5:302017-05-17T02:24:41+5:30
आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्यांशी सध्याच्या जलयुक्त शिवार योजनेतील कथित घोटाळ्यांशी तुलना करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्या ‘जलयुक्त’
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्यांशी सध्याच्या जलयुक्त शिवार योजनेतील कथित घोटाळ्यांशी तुलना करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्या ‘जलयुक्त’च्या कामाची चौकशी करण्याची आपली तयारी आहे असे आव्हान जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आज दिले. ते पत्रकारांशी बोलत होते.
ठाकरे यांचा आरोप तथ्यहिन असल्याचे सांगून ते म्हणाले, हा आरोप म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्ळाचा प्रकार आहे. त्यांनी वा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ‘जलयुक्त’च्या कामांवर टीका करण्याआधी सरकार पारदर्शकपणे करीत असलेल्या कामांची माहिती घ्यायला हवी होती. शेवटी आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत. माझ्या खात्याचे राज्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत, असे राम शिंदे म्हणाले.
जलयुक्तमधील कामे जनता सुचवते, ग्रामसभा त्यांना अनुमती देते, कामे पूर्ण झाल्याचे ग्रामसभेने आणि त्रयस्थ एजन्सीने प्रमाणित केल्यानंतरच बिले अदा केली जातात. जलयुक्तमुळे कृषी उत्पन्नात वाढ झाली आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताना रामदास कदम यांनी सरकारला नव्हे तर स्थानिक पालकमंत्री रवींद्र वायकर यांना लक्ष्य बनविलेले दिसते, असा चिमटाही शिंदे यांनी काढला.
मृद व जलसंधारण आयुक्तालय औरंगाबाद येथे १ मे पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यास थोडा विलंब झाला असला तरी आजच आपली या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली आहे. या आयुक्तालयासाठी आयएएस दर्जाचा अधिकारी लवकरच दिला जाईल आणि हे आयुक्तालय सुरू होईल, असे शिंदे यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले.