'जयदेव' यांच्यामुळे ठाकरे बंधूंची जुळणार मनं ?
By admin | Published: July 29, 2016 08:45 PM2016-07-29T20:45:56+5:302016-07-29T20:45:56+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब-याच वर्षांनंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
ऑनलाइन लोकमत
मुबंई, दि. 29 - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब-याच वर्षांनंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तब्बल सव्वा तास राज-उद्धव यांच्यामध्ये चर्चा झाल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकांनी आगामी पालिका निवडणुकीत दोघे बंधू एकत्र येणार असल्याची आवई उठवली होती. मात्र राज आणि उद्धव यांच्या भेटीमागील खरं कारण लोकमतच्या सूत्रांकडून आम्हाला समजलं आहे.
राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीदरम्यान जयदेव ठाकरेंच्या मालमत्तेसाठीच्या न्यायालयीन लढाईवरच चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून हाती लागली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अचानक भेटीवर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. जयदेव ठाकरेंच्या माध्यमातूनच राज आणि उद्धव यांची मनं पुन्हा जुळणार का?, असा विषय आता चर्चिला जाऊ लागला आहे. राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी जयदेव ठाकरे फक्त निमित्तमात्र आहेत. खरं तर या दोघांनीही एकत्र यावं असं उभ्या महाराष्ट्राला वाटतं आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजपच्या दबावतंत्रातली हवा आपोआपच निघून जाईल. काही दिवसांपूर्वीच्या भाजपाच्या भूमिकेवरून भाजप शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना जुमानत नसल्याचं समोर आलं आहे.
उद्धव ठाकरेंनी सत्तेतून बाहेर पडण्याचा भाजपला इशाराही दिला आहे. मनसेला सोबत घेतल्यास उद्धव ठाकरेंना भाजपला नामोहरम करणं सोपं जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेतल्यास मुंबई महापालिकेवर भगव्याची जादू कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात राज-उद्धव ठाकरे येतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.