कोर्लईतील ठाकरेंची साडे नऊ एकर जमीन पण १९ बंगले कागदावरच; सरपंचांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:41 PM2022-02-17T12:41:12+5:302022-02-17T12:45:00+5:30
जेव्हा या जागेचा मुद्दा चर्चेत आला, तेव्हा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गेल्यावर्षी तेथे जाऊन पाहणी केली, तेव्हा घरे, जोते पाडून टाकल्याचे आढळून आले असं सरपंचांनी सांगितले.
रायगड : अलिबागच्या मुरुड-कोर्लई येथे रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांच्या नावावर साडेनऊ एकर जमीन असली, तरी त्यावर फक्त झाडे लावलेली आहेत. तेथे एकही घर नाही. या जागेवर ठाकरेंच्या मालकीचे १९ बंगले असल्याचे वृत्त निराधार असून, हे बंगले कागदावरच असल्याचे वास्तव कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी उघड केले आहे.
येथील जमीन आधी अन्वय नाईक यांनी खरेदी केली होती. या जागेवर रिसॉर्ट उभारण्याची त्यांची कल्पना होती. मात्र जमीन सीआरझेडमध्ये येत असल्याने ती योजना रद्द करून त्यांनी ती रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांना विकली. सध्या तेथे नारळाची झाडे, गुरांचा गोठा, पंप शेड, विहीर, पाण्याच्या टाक्या, साठवण तलाव आहे. या जमिनीवर १८ कच्ची घरे होती. नंतर ती पाडून टाकण्यात आली. मात्र ग्रामपंचायतीला त्याची कल्पना नव्हती. या जागेला कुलूप असल्याने त्याची पाहणी केलेली नव्हती. त्यामुळे घरे अस्तित्वात आहेत, हे गृहीत धरून त्यासाठी साडेतीन हजारांचा कर आकारण्यात आला. तो ऑनलाइन पद्धतीने ठाकरे कुटुंबीयांनी भरला. पण यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोणताही माफीनामा दिला नसल्याचे व त्याची ग्रामपंचायतीच्या दफ्तरी नोंद नसल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले.
जेव्हा या जागेचा मुद्दा चर्चेत आला, तेव्हा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गेल्यावर्षी तेथे जाऊन पाहणी केली, तेव्हा घरे, जोते पाडून टाकल्याचे आढळून आले. घरे अस्तित्वात नसल्याने त्यांची नोंद रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ठाकरेंच्या नावावर अलिबागमध्ये कोर्लेई गावात १९ बंगले असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारच्या पत्रकार परिषदेत हा दावा खोडून काढला. तुम्हाला जर ते बंगले दिसले, तर मी राजकारण सोडेन आणि दिसले नाहीत, तर त्या सोमय्यांना जोड्याने मारा, असे विधान राऊत यांनी केले होते.
रश्मी ठाकरे यांचा माफीनामा नाही
घरे अस्तित्वात आहेत, हे गृहीत धरून त्यासाठी साडेतीन हजारांचा कर आकारण्यात आला. तो ऑनलाइन पद्धतीने ठाकरे कुटुंबीयांनी भरला. पण यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोणताही माफीनामा दिला नसल्याचे व त्याची ग्रामपंचायतीच्या दफ्तरी नोंद नाही असे मिसाळ म्हणाले.
कोणत्याही ठाकरेंनी कधीही भेट दिली नाही!
अन्वय नाईक यांनी २००९ मध्ये रिसॉर्टसाठी परवानगी मागितली होती. त्या काळात त्यांनी काही बांबूची घरे, जोते बांधले होते. मात्र त्यांना रिसॉर्टची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी रिसॉर्टचा प्लॅन रद्द करून तेथे झाडे लावली. पुढे २०१४ ला त्यांनी ही जागा रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांना विकली. त्यानंतर २०१५ ते २०१९ या काळात त्यांच्यापैकी कुणीही इथे आले नाही. २०१९ मध्ये आम्ही पत्र पाठवून २०१४ पासून ते २०१९ पर्यंतची घरपट्टीची थकबाकी भरावी, अशी रीतसर नोटीस पाठवली. त्यानंतर २०१९ ला आरटीजीएसने ही घरपट्टी भरण्यात आली.
घरपट्टी भरल्यानंतर पुढील काळात ही जागा चर्चेत आल्यावर आम्ही त्या फार्महाऊसवर गेलो, तेव्हा आमच्या लक्षात आले की, तेथे अशा प्रकारची कुठलीही घरे नसताना त्यांच्याकडून कर आकारणी झाली आहे. त्यासंदर्भात माहिती घेतल्यावर कळले की, २०१३-१४ ला तेथील बांबूची घरे तोडून झाडे लावण्यात आली आहेत.
२०१९ ला जी घरे नावावर होती, त्या घरांचा कर ग्रामपंचायतीने २०२१ पर्यंत घेतला. पाहणी केल्यावर आम्ही त्या घरांची नोंद रद्द केली. - प्रशांत मिसाळ, सरपंच कोर्लई