'फडणवीसांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही'; ठाकरेंच्या सेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, केले मोठे गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 09:45 IST2025-02-26T09:42:44+5:302025-02-26T09:45:06+5:30
विशेष कार्य अधिकारी आणि खासगी सहाय्यक नियुक्तीच्या मुद्द्यावर भाष्य करताना ठाकरेंच्या शिवसेनेचे काही मोठे गौप्यस्फोट केले आहेत. फडणवीसांनी फिक्सर संबोधलेल्यांची नावे पंतप्रधान मोदींकडे पाठवायला हवी, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

'फडणवीसांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही'; ठाकरेंच्या सेनेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, केले मोठे गौप्यस्फोट
"मंत्र्यांकडून ‘पीए’ व ‘ओएसडी’ म्हणून ज्यांची नावे मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली गेली, त्यातील 16 नावे मुख्यमंत्र्यांनी थेट नाकारली. कारण हे 16 जण आधीच्या मिंधे सरकारात मंत्र्यांचे ‘ओएसडी’ बनून दलाली, फिक्सिंग करीत होते. हे सर्व ‘फिक्सर’ मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाकारले. ‘फिक्सर’ नेमू देणार नाही ही मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य आहे", अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंच्या शिवसेनेने सामनातून कौतुक केले आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोटही केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ठाकरेंच्या शिवसेनेने सामना अग्रलेखातून फडणवीसांच्या निर्णयाचे स्वागत करताना एकनाथ शिंदे यांच्याकडून भ्रष्टाचार करण्यात आल्याचा दावा केला आहे.
'आमदार,खासदार, नगरसेवकांना विकत घेण्यासाठी नगरविकास खात्याची लूट'
शिवसेनेचे असा दावा केला आहे की, "आमदार, खासदार, नगरसेवक, खऱ्या शिवसेनेचे पदाधिकारी यांना विकत घेण्यासाठी व नंतर पोसण्यासाठी लागणारा पैसा रस्ते, बांधकाम ठेकेदार, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा, एसआरए, नगरविकास खात्याची लूट करूनच जमा केला गेला."
"हा लुटीचा पैसा आपल्या खिशात पडावा यासाठी अनेकांनी पक्षांतरे केली. पैशांचा हा प्रवाह आला कोठून, तर बेकायदेशीर टेंडर्स, बनावट कामे, निधीवाटपातील कमिशनबाजी, भूखंड घोटाळे, गृहनिर्माणातील दलाली या ‘आशर’ मार्गाने हा पैसा जमा झाला. शिंद्यांचे मुख्य कलेक्टर आशर प्रा. लि. हे दहा हजार कोटी रुपये घेऊन दुबईत पळाले आहेत, अशी ताजी खबर आहे", असा खळबळजनक गौप्यस्फोट ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे.
"शिंदे व त्यांच्या लोकांची दाणादाण उडाली"
शिवसेनेने याच मुद्द्यावर भाष्य करताना म्हटले आहे की, "500 कोटींचे टेंडर तीन हजार कोटींपर्यंत वाढवून मधले हजार कोटी काम सुरू होण्याआधीच ताब्यात घ्यायचे, त्यातले शे-दोनशे कोटी चेल्यांत वाटायचे व त्या सगळ्यांना घेऊन प्रयागतीर्थी गंगास्नान घडवायचे. या सर्व कारनाम्यांना बूच लावण्याचे पवित्र काम फडणवीस यांनी सुरू केले आहे. त्यामुळे शिंदे व त्यांच्या लोकांची दाणादाण उडाली नसेल तर नवलच! फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणखी एक महत्त्वाचे काम केले. मंत्र्यांचे ‘पीए’ व ‘ओएसडी’ नेमण्याचे अधिकार काढून घेतले", असे म्हणत फडणवीसांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
"शिंदेंनी पुण्यात पहाटे ४ वाजता घेतली शाहांची भेट"
"शिंदे यांच्या पक्षाचे संस्थापक अमित शहा आहेत व फडणवीस यांच्या कठोर शिस्तीची तक्रार करण्यासाठी शिंदे हे पुण्यात पहाटे 4 वाजता अमित शहांना भेटले. फडणवीस आमच्या पोटावर मारत आहेत व आमदार, खासदारांची पोटे रिकामी राहिली तर तुमचा पक्ष टिकणार नाही असे शिंदे यांनी शहांच्या कानी घातले", असा खळबळजनक दावा ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे.
पुढे म्हटले आहे की, "याउलट मोदी यांची भूमिका भ्रष्टाचार खतम करण्याची आहे. 'मला फक्त पैसे खाणाऱ्यांची नावे कळवा, एकेकाला सरळ करतो', असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे. फडणवीस यांनी शिंदे व त्यांच्या फिक्सर लोकांची नावे पंतप्रधान मोदींना कळवायला हरकत नाही", असा सल्ला शिवसेनेने (यूबीटी) फडणवीसांना दिला आहे.
"महाराष्ट्रात तीन वर्षांपूर्वी शिंद्यांचे राज्य हे ‘फिक्सिंग’मधूनच अवतरले. त्यामुळे राज्यात फिक्सर व दलालांचे उदंड पीक आले. हे पीक कापण्याचे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, पण त्यांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही. कारण पिकावरचा दाढीवाला खोडकिडा म्हणतोय, 'मला हलक्यात घेऊ नका.' फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल", असा सावधगिरीचा इशाराही फडणवीसांना ठाकरेंच्या शिवसेनेने दिला आहे.