ठामपाची वसुली तब्बल २५६ कोटींनी वाढली
By admin | Published: April 7, 2017 03:16 AM2017-04-07T03:16:58+5:302017-04-07T03:16:58+5:30
२०१६-१७ या आर्थिक वर्षात विविध करांच्या स्वरुपात केलेली वसुली ही मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल २५६.८२ कोटींनी अधिक झाली
ठाणे : ठाणे महापालिकेने वसुलीसाठी विविध मार्गांचा अवलंब केल्यानंतर २०१६-१७ या आर्थिक वर्षात विविध करांच्या स्वरुपात केलेली वसुली ही मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल २५६.८२ कोटींनी अधिक झाली आहे. विशेष म्हणजे दिलेल्या सुधारीत लक्ष्याचा पाठलाग करण्यातही पालिकेला यश आले आहे.
ठाणे महापालिकेमार्फत यंदा विविध करांची वसुलीसाठी नाना शकला अवलंबविल्या होत्या. त्यामध्ये सुरुवातीला नोटिसा बजावणे, जप्तीची कारवाई आणि त्यातही प्रत्येक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेले टार्गेट यामुळे पालिकेच्या उत्पन्नात यंदा प्रथमच भरघोस वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जकात आणि एलबीटी बंदीनंतर झालेली ही वाढ उल्लेखनीय अशीच म्हणावी लागणार आहे. महापालिका आयुक्तांनी २०१६-१७ मध्ये २०८६ कोटींचे उत्पन्न प्रस्तावित केले होते. महासभेने त्यात वाढ करुन ते २१९५ कोटींचे केले होते. परंतु, सुधारीत अंदाजपत्रक बनवितांना त्यात घट करुन ते २०२७ कोटींवर आणून ठेवले होते. यामध्ये एलबीटी बंद झाल्याने उत्पन्नाचे दिलेले लक्ष्य गाठता येणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार आयुक्तांनी वसुलीसाठी विविध योजना हाती घेतल्या होत्या. त्यात त्यांना काही अंशी का होईना यश आल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार ३१ मार्चपर्यंत सर्व प्रकारच्या करातून पालिकेच्या तिजोरीत २०७२ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी ३१ मार्च पर्यंत पालिकेच्या तिजोरीत १८१६ कोटींचे उत्पन्न पडले होते. परंतु यंदा मात्र त्यात तब्बल २५६ कोटींची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान मालमत्ता कर विभागाला यंदा ४५६ कोटींची लक्ष दिले असतांना या विभागाने ३१ मार्च अखेर ३८०.५१ कोटींची वसुली केली आहे. मागील वर्षी ती ३४५ कोटी एवढी होती. त्यात ३६ कोटींची वाढ झाली आहे. तर स्थानिक संस्था कर बंद झाला असला तरी, मागील वर्षीच्या तुलनेत या विभागामार्फत ८.५७ कोटींची जास्तीची वसुली झाली आहे. मागील वर्षी ६३५ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र ६४३ कोटी पालिकेने वसूल केले आहेत. तर शासनाकडून मिळणारे अनुदान देखील यंदा ३८३ कोटी मिळाले आहेत.
दुसरीकडे शहर विकास विभागाने देखील मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १८३ कोटी अधिक वसूल केले आहेत. मागील वर्षी या विभागाने ४८४ कोटींची वसुली केली होती. यंदा ती ६८८ कोटींवर गेली आहे. (प्रतिनिधी)
पाणीपुरवठ्याच्या वसुलीवर परिणाम
सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पिछाडीवर पडला आहे. मागील वर्षी या विभागाने १२७ कोटींची वसुली केली होती. यंदा ती केवळ १०६ कोटीच झाली आहे. जाहिरात विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत जास्तीची वसुली केली आहे.
पाणीपुरवठ्याच्या वसुलीवर चांगलाच परिणाम झाला. मागील वर्षी या विभागाने १०७ कोटींची वसुली केली होती. यंदा १०२ कोटींवरच समाधान मानावे लागले आहे.