उपसभापतीपदी काँग्रेसचे ठाकरे !
By admin | Published: August 6, 2016 05:02 AM2016-08-06T05:02:38+5:302016-08-06T05:02:38+5:30
विधान परिषदेच्या उपसभापतीपदी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची आज बिनविरोध निवड झाली.
मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची आज बिनविरोध निवड झाली. भाजपाचे भाई गिरकर यांनी मतदान प्रक्रिया सुरू होत असताना उमेदवारी मागे घेतल्याने ठाकरे यांचा उपसभापती पदाचा मार्ग मोकळा झाला.
ठाकरे हे विधानसभेचे सदस्यही राहिले असून राज्याचे गृह राज्यमंत्रीपद त्यांनी सांभाळले आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सर्वात जास्त काळ राहिलेले आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे विधान परिषदेत आल्यानंतर पक्षाचा किल्ला लढविण्याचे काम करीत असताना आता तुलनेने सौम्य स्वभावाचे असलेले ठाकरे हे उपसभापती झाले आहेत. उपसभापती पदासाठी भाजपाकडून कालच भाई गिरकर यांचे नाव देण्यात आले होते. आज सभागृहात मतदान प्रक्रि या सुरु होताच भाजपचे सुजितसिंह ठाकूर यांनी गिरकर यांची उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले, यावेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठाकरे यांची एकमताने निवड झाल्याचे जाहीर केले. या आधी उपसभापतीपद हे राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांच्याकडे होते. डावखरे यांचा ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अलिकडेच पराभव झाल्यापासून हे पद रिक्त होते.
उपसभापतीपदासाठी काँग्रेसकडून ज्येष्ठ सदस्य माणकिराव ठाकरे तर भाजपकडून विजय उर्फ भाई गिरकर यांनी उमेदवारी अर्ज काल भरला होता. विधान परिषदेतील संख्याबळानुसार काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार माणकिराव ठाकरे यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता असतानाच भाजपने उमेदवार उभा केल्याने सभागृहात मतदानाची प्रक्रि या पार पडली.
विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आण िकाँग्रेसचे संख्याबळ सत्ताधाऱ्यांपेक्षा अधिक आहे. सध्या सभापती आणि विरोधी पक्षनेता ही दोन्ही पदे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. तर आघाडीतील सूत्रानुसार उपसभापतीपद काँग्रेसला देण्याचे ठरले होते. गेल्या महिन्यात विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने दोन उमेदवार दिले होते. तर काँग्रेसने एकच उमेदवार दिला होता. संख्याबळानुसार दोन्ही पक्षांचे एकेक उमेदवार सहज निवडून येतील असे चित्र होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे दुसरे उमेदवार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची जागा धोक्यात आली असती. मात्र, त्यावेळी मतदान झाल्यास काँग्रेसने त्यांच्याकडील अतिरिक्त मते राष्ट्रवादीला देण्याचे कबूल केले होत आणि त्या बदल्यात राष्ट्रवादीने उपसभापतीपद काँग्रेससाठी सोडायचे अशी तडजोड झाली होती. (विशेष प्रतिनिधी)
>काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याने त्यांची उपसभापतीपदी निवड होणार हे निश्चित झाले होते. ठाकरे यांचे सभापतीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, सुनील तटकरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती पदही आता विरोधी पक्षांकडे आले आहे.