'ठाकरे बंधू आले एकत्र', या कारणामुळे आदित्य-अमितची जुळली मनं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 11:55 AM2017-09-17T11:55:11+5:302017-09-17T11:56:11+5:30
महाराष्ट्राच्या राजकणातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे ठाकरे कुटुंब. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं अशी आख्या महाराष्ट्राची इच्छा आहे.
मुंबई, दि. 17 - महाराष्ट्राच्या राजकणातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे ठाकरे कुटुंब. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं अशी आख्या महाराष्ट्राची इच्छा आहे. पण राजकरणाच्या पटलवार ते शक्य नसल्याचे कित्येकदा दिसून आले. पण ठाकरे कुटुंबातील पुढची पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे एकत्र आले आहेत. मात्र हे राजकारणामुळे नव्हे तर फुटबॉलप्रेमामुळे एकत्र आले आहे. काल रात्री लोअर परळमधील सेंट रेजिस हॉटेलमध्ये या दोघांची भेट झाली. यावेळी या ठाकरे बंधूंनी अर्धा-पाऊण तास चर्चा केली. यानंतर दोघांनी एकत्रित जेवणही केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध उभ्या महाराष्ट्राला माहित आहेत. मात्र आदित्य आणि अमित यांच्या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीवरुन काहींनी तर्कवितर्कही लढवायला सुरुवात केली.
फुट्सल लीगचे आयोजन अमित ठाकरेंनी केले होते. या स्पर्धेसाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंना भेटण्याची इच्छा आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली होती. त्यानुसार आदित्य त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. आदित्य ठाकरे हे मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तर फुट्सल लीग ही फुटबॉल स्पर्धा अमित ठाकरेंची संकल्पना आहे. अमित ठाकरे स्वत: फुटबॉलपटू आहेत.
या भेटीचे फोटो प्रसारमाध्यमांमध्ये झळकले असून या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची घाई करु नये असे राजकीय विश्लेषकांचे सांगितले. यापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेदेखील एकत्र आले होते. पण त्यानंतरही दोन्ही पक्षांची युती झाली नव्हती याकडे अनेकांनी लक्ष वेधले.