राज्यात थॅलेसेमियाचे सहा हजार रुग्ण
By admin | Published: April 7, 2017 05:54 AM2017-04-07T05:54:41+5:302017-04-07T05:54:41+5:30
राज्यातील थॅलेसेमिया या अनुवांशिक रक्ताच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली
मुंबई : राज्यातील थॅलेसेमिया या अनुवांशिक रक्ताच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. थॅलेसेमियाग्रस्तांची संख्या पाच हजार ९८४ झाली आहे. यात बालरुग्णांची संख्या मोठी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधानपरिषदेत दिली.
जगन्नाथ शिंदे, हेमंत टकले आणि विद्या चव्हाण यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना सावंत म्हणाले की, अपेक्षेपेक्षा जास्त थॅलेसेमियाचे रुग्ण आढळले आहेत. जिथे आवश्यक आहे, तिथे औषधाचा साठा तत्काळ पोचवला आहे त्यामुळे सरकारी अनास्थेचा प्रश्न येत नाही. औषध खरेदीची निविदा प्रकाशित झाली असून निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. ती पूर्ण होताच गोळयांचा पुरवठा करण्यात येईल.
ठाणे जिल्ह्यात ६०० रुग्ण आहेत, एक महिन्यापासून जिल्हयातील सरकारी रुग्णालयांतील थॅलेसेमियाच्या गोळयांचा साठा संपलेला आहे, याकडे जगन्नाथ शिंदे यांनी लक्ष वेधले. यावर उत्तर देताना सावंत म्हणाले, ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांना स्थानिक स्तरावर औषधे खरेदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक औषधे मिळण्यात खंड पडू नये, यासाठी जाहीर निविदा प्रक्रिया करून दर करार करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयातही थॅलेसेमिया आजारासंबंधी रक्तचाचणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सरकार आग्रही आहे. यासंबंधी लवकरच बैठक होईल, असे आश्वासन सावंत यांनी दिले. (प्रतिनिधी)