ठाण्यात पोटनिवडणुकीत ३५ टक्के मतदान
By admin | Published: January 19, 2015 04:37 AM2015-01-19T04:37:48+5:302015-01-19T04:37:48+5:30
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील वागळे इस्टेटमधील ३ आणि मुंब्य्रातील २ अशा ४ प्रभागांकरिता रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले
ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील वागळे इस्टेटमधील ३ आणि मुंब्य्रातील २ अशा ४ प्रभागांकरिता रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. या पाचही ठिकाणी सुमारे ३५ ते ४० इतके टक्के मतदान झाले. रविवार असूनही प्रामुख्याने मुंब्रा परिसरात मतदारराजाने पाठ फिरवल्याचे दिसून आले.
ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक - १३ अ मध्ये काँगे्रसच्या नगरसेविका कांचन चिंदरकर, तर ३४ अ व ब या ठिकाणच्या नगरसेविका जयश्री फाटक व नगरसेवक रवींद्र फाटक यांनी काँग्रेस नगरसेवकपदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. ६१ अ मधील अब्दुल रौफ लाल व ६३ अ च्या रजिया शेख यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने या ५ ठिकाणी पोटनिवडणुकीचे आज मतदान घेण्यात आले. वागळे इस्टेट परिसरात शिवसेनेच्या चिंदरकर यांच्याविरोधात काँग्रेसच्या शीतल चव्हाण आणि फाटक दाम्पत्याविरोधात काँग्रेसकडून डॉ. अभिजित पांचाळ व ललिता टाकळकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी साजीद मोहम्मद युसुफ आणि हसीना अब्दुल आजीस शेख यांना उमेदवारी दिली होती. तर समाजवादी पक्षाने अन्सारी मोहम्मद अनिस आणि शहापरा अस्फाक अली यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.
वागळे व किसननगर भागात तीन पोटनिवडणुकांत शिवसेना विरु द्ध काँगे्रस तर मुंब्य्रात राष्ट्रवादी काँगे्रस विरोधात समाजवादी पार्टी अशी लढत झाली. रविवारी सकाळी मतदारांचा अल्प प्रतिसाद दिसून आला. या पाचही ठिकाणी दुपारी साडेतीनपर्यंत केवळ २६ टक्के मतदान झाले होते. मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. प्रभाग क्रमांक १३ अ मध्ये अंदाजे ४२ ते ४३, ३४ अ आणि ब येथे ५३ ते ५४ तसेच ६१ अ मध्ये २० ते २१ इतके मतदान झाले आहे. सोमवारी दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये मतमोजणी होणार आहे. त्यानंतरच आपापले बालेकिल्ले राखण्यामध्ये कोण यशस्वी ठरणार, हे स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)