ठाण्यात दिवाळीत रात्री दहानंतर फटाके फोडण्यास मनाई
By admin | Published: October 19, 2016 06:05 AM2016-10-19T06:05:50+5:302016-10-19T06:05:50+5:30
दिवाळीत रात्री १० ते सकाळी सहा या वेळेत फटाके फोडू नयेत, असे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्तांनी अधिसूचना काढून दिले आहे.
ठाणे : दिवाळीत रात्री १० ते सकाळी सहा या वेळेत फटाके फोडू नयेत, असे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्तांनी अधिसूचना काढून दिले आहे. ठाणेकरांसह आयुक्तालय परिक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना ते बंधनकारक असतील.
उपरोक्त अधिसूचनेत डे-नाईट आऊट, रॉकेट, अॅटमबॉम्ब, आपटी बार, तडतडी यासारखे फटाके फोडू नयेत, असे आयुक्तांनी म्हटले आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी २८ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान, कोणालाही त्रास अगर नुकसान होईल अशाप्रकारे रस्त्यात, इमारतीत तसेच त्यापासून ५० फुटांच्या आत फटाके उडविण्यास बंदी घातली आहे. तसेच स्फोटक पदार्थांची हातगाडी अथवा लाकडी ट्रे मधून रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी विक्री करण्यास मनाईही केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसह उत्पादकांवर कारवाई करण्यात येईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
फटाक्यांच्या आवरणावर कुठल्याही धर्माच्या देवाचे किंवा धार्मिक ग्रंथ इत्यादींचे फोटो, मजकूर असल्याने धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा फटाक्यांचे उत्पादन अथवा त्यांची विक्री करू नये. अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)