ठाण्यात बहुजन क्रांती मोर्चा
By admin | Published: January 7, 2017 03:54 AM2017-01-07T03:54:15+5:302017-01-07T03:54:15+5:30
मराठा मोर्चानंतर शुक्रवारी शहरात बहुजन समाजाने क्रांती मोर्चा काढून विविध जातीजमातींच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
ठाणे- मराठा मोर्चानंतर शुक्रवारी शहरात बहुजन समाजाने क्रांती मोर्चा काढून विविध जातीजमातींच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. येथील तीनहातनाक्यावरून निघालेला हा मोर्चा गोखले रोड, ठाणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून बाजारपेठेतून तलावपाळी, जांभळीनाक्यावर विसर्जित करण्यात आला. या दरम्यान ठिकठिकाणी एकतर्फी वाहतुकीसह चालकांना काही ठिकाणी वाहतूककोडींला सामोरे जावे लागले.
ठाणे जिल्ह्यातील सामाजिक संघटनांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये कुणबी, ओबीसी, एससी, एसटी, डीएनटी, व्हीजेएनटी, एसबीसी, एमबीसी, अल्पसंख्याक मुस्लिम, जैन, लिंगायत, शीख, बौद्ध, ख्रिश्चन आदी कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. भूमिपुत्रांच्या जमिनी घेणे बंद करा. अॅट्रॉसिटी कायद्याखालील आरोपींवर कठोर कारवाई करा. मुस्लिमांसाठी सच्चर समितीच्या शिफारशी लागू करा. शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करा. सर्व जातीजमातींना कायद्याचे संरक्षण द्या.
बहुजनांचे शिक्षण संपवण्याचे कटकारस्थान थांबवा. कर्मचाऱ्यांसाठी जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करावी. ४५० स्क्वेअर फुटांचे हक्काचे घर मिळावे, आदी मागण्या करण्यात आल्या. या वेळी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने चांगली भूमिका निभावली. चिंतामणी चौकात लावण्यात आलेले स्टेज अन्य ठिकाणी लावण्याची सूचना पोलिसांनी ऐन वेळी दिली.
(छायाचित्र- विशाल हळदे)