येत्या ४८ तासात ठाणे बॅनरमुक्त करा!
By admin | Published: September 19, 2016 03:25 AM2016-09-19T03:25:23+5:302016-09-19T03:25:23+5:30
महापालिकेची परवानगी घेतली नसेल, त्या मंडळांना नवरात्र उत्सवासाठी परवानगी देऊ नये, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.
ठाणे : गणेशोत्सवात शहराच्या विविध भागात लावलेले जाहिरात फलक ४८ तासांमध्ये काढण्याच्या सूचना देत, ज्या मंडळांनी मंडप उभारणीसाठी महापालिकेची परवानगी घेतली नसेल, त्या मंडळांना नवरात्र उत्सवासाठी परवानगी देऊ नये, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. विनापरवानगी फलके लावणाऱ्या मंडळांना नोटीस बजावून दंड वसूल करण्यासही सांगितले आहे.
रविवारी महापालिका आयुक्तांनी विविध कामांचा आढावा घेण्यासाठी सकाळी सर्व अधिकाऱ्यांची आणि विभाग प्रमुखांची बैठक महापालिका मुख्यालयामध्ये आयोजित केली होती. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये अनेक गणेशोत्सव मंडळांनी आणि नागरिकांनी ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता शहराच्या विविध ठिकाणी जाहिरात फलक लावले होते. हे फलक तातडीने काढण्याची कारवाई करतानाच सबंधित मंडळांना नोटीस देऊन दंडाची रक्कम वसूल करावी, अशा सूचना आयुक्तांनी या बैठकीत सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.
ठाणे महानगरपालिकेच्या बस स्टॉपवर लावण्यात येणारे वाढदिवस किंवा शुभेच्छांचे जाहिरात फलक यापुढे महापालिकेची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय लावले जाणार नाहीत याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.