ठाणे चेकमेट दरोडा : चार आरोपींना न्यायालयीन कोठडी
By admin | Published: July 20, 2016 07:52 PM2016-07-20T19:52:03+5:302016-07-20T19:52:03+5:30
येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा.लि. या दरोड्यातील वैभव लहांमगे, लकी ऊर्फ लक्ष्मण गोवर्धने, हरिभाऊ वाघ आणि भास्कर ऊर्फ भरुण संतोष शिंदे या चौघा आरोपींना आता न्यायालयीन कोठडीत
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि.20 - येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा.लि. या दरोड्यातील वैभव लहांमगे, लकी ऊर्फ लक्ष्मण गोवर्धने, हरिभाऊ वाघ आणि भास्कर ऊर्फ भरुण संतोष शिंदे या चौघा आरोपींना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.एल. गुप्ता यांनी दिले आहेत. आतापर्यंत लुटीतील ११ कोटींपैकी १० कोटी आठ लाख रुपये ठाणे पोलिसांनी हस्तगत केले असून याप्रकरणी १६ जणांना अटक केली आहे.
नाशिकमधून ६ जुलै रोजी हरिभाऊसह वरील या चौघांना स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना आधी ठाणे न्यायालयाने १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर, पुन्हा तीन दिवस वाढीव कोठडीची मुदत २० जुलै रोजी संपली. याच तीन दिवसांच्या काळात १६ व्या मीनानाथ चव्हाण या आरोपीकडून घोटी, इगतपुरी येथून पाच लाख ७९ हजारांची रोकड हस्तगत केली. वरील चौघांच्याही पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना बुधवारी ठाणे न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. वैभवसह चौघांकडून प्रत्येकी ६० लाख अशी दोन कोटी ४० लाखांची त्यांच्या वाट्याला आलेली संपूर्ण रोकड हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.