ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी बंद, सरनाईकांचा स्तुत्य निर्णय

By admin | Published: August 11, 2014 02:38 PM2014-08-11T14:38:06+5:302014-08-11T14:56:31+5:30

ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानने दहीहंडी बंद करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला असून याऐवजी अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करु अशी घोषणा संस्कृती प्रतिष्ठानचे प्रमुख आ. प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Thane Culture Pratishthan's Dahi Handi Bandh, Sarnaik's Precious Judgment | ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी बंद, सरनाईकांचा स्तुत्य निर्णय

ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी बंद, सरनाईकांचा स्तुत्य निर्णय

Next

ऑनलाइन टीम

ठाणे, दि. ११ - मुंबई, ठाण्यासह राज्यभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली ठाण्यातील दंहीहंडीतील इव्हेंट 'संस्कृती' बंद होणार आहे. ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानने दहीहंडीतील थरांसाठी लाखोंची बक्षिस देण्याची प्रथा बंद करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला असून याऐवजी अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करु अशी घोषणा संस्कृती प्रतिष्ठानचे प्रमुख आ. प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 

गेल्या काही वर्षांत दहीहंडीत लाखोंच्या बक्षिसाची उधळण होत असल्याने या उत्सवाचे रुपच बदलले आहे. गोविंदा पथकं या पारितोषिकांपायी थरांचा विक्रम करण्यासाठी झटतात. पण या नादात अनेक गोविंदा जखमी होतात. काही वेळेला ही स्पर्धा गोविंदा पथकातील तरुणांच्या जीवावरही बेतते. यंदा बाल हक्क संरक्षण आयोगाने १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडीवर चढविण्यास बंदी घातली आहे. याला गोविंदा पथकांनी विरोध दर्शवला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानने यंदापासून दहीहंडीचा मेगा इव्हेंट न करता साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. 

संस्कृती प्रतिष्ठानचे प्रमुख आ. प्रताप सरनाईक म्हणाले, जोगेश्वरी, नवी मुंबई येथे सरावा दरम्यान गोविंदांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने आता आयोजकांनीच या थरांच्या स्पर्धेवर निर्णय घेण्याची गरज होती. त्यामुळेच आम्ही थरांची स्पर्धा न करता साधेपणाने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. यंदा आम्ही थरांसाठी लाखो रुपयांचे बक्षिसे देणार नसून याऐवजी आम्ही गोविंदा पथकांसाठी सराव शिबीर आयोजित करु. यात गोविंदा पथकांना एक प्रमाणपत्र आणि सेफ्टी किट भेट म्हणून देणार आहोत असे सरनाईक यांनी सांगितले. अपहरणाच्या भितीने रिक्षेतून उडी मारणा-या स्वप्नाली लाडचा उपचाराचा सर्व खर्च संस्कृती प्रतिष्ठान करणार असल्याचे सरनाईक म्हणाले.  राज्य सरकारने दहीहंडीचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश केल्यास या खेळात नियमावली तयारी होईल व गोविंदा पथकांमधील जीवघेण्या स्पर्धेवर अंकूश बसेल. मात्र दुर्दैवाने राज्य सरकारने याविषयी अद्याप निर्णय घेतलेला नाही अशी टीकाही त्यांनी केली. 

Web Title: Thane Culture Pratishthan's Dahi Handi Bandh, Sarnaik's Precious Judgment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.