ठाणे : ‘त्या’ चीनी आरोपीचा मृत्यू ‘ब्रेन हॅमरेज’ने, शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 04:26 AM2017-09-09T04:26:19+5:302017-09-09T04:26:25+5:30
ठाणे : हिरेचोरीच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या चीनी नागरिकाचा २९ आॅगस्टला झालेला मृत्यू हा ब्रेन हॅमरेजने झाला आहे. ही बाब शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून गुरुवारी पुढे आली आहे, तसेच त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फेब्रुवारीत पर्यटक म्हणून भारतात आलेल्या जियांग चांगकिंग (४८) आणि त्याच्या एका साथीदाराला मुंबईतील वनराई पोलिसांनी १ आॅगस्ट रोजी हिरेचोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर, त्यांची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात २ आॅगस्टला केली. २९ आॅगस्टला कारागृहात जेवणासाठी इतर कैद्यांबरोबर रांगेत उभा असताना, तो अचानक कोसळला. त्याला ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवल्यावर, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या प्रकरणी ठाणेनगर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्याचा मृतदेह जे. जे. रुणालयातच ठेवला होता. बुधवारी ६ सप्टेंबर रोजी जियांग याचे नातेवाईक आल्यानंतर, त्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर, त्याच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले. याच दरम्यान, जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदनाच्या दिलेल्या प्राथमिक अहवालात जियांगचा मृत्यू हा ब्रेन हॅमरेजने झाल्याचे म्हटले असल्याची माहिती, सहायक पोलीस निरीक्षक जे. एम. पाटील यांनी दिली.