ठाणे, डोंबिवलीत ‘पद्मावत’ला विरोध, ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:31 AM2018-01-25T03:31:39+5:302018-01-25T03:31:57+5:30
‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित होण्याच्या पूर्वसंध्येला ठाणे आणि डोंबिवलीत खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करणाºया करणी सेना, राजपूत सेना तसेच हिंदू सेनेच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुंबई : ‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित होण्याच्या पूर्वसंध्येला ठाणे आणि डोंबिवलीत खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करणाºया करणी सेना, राजपूत सेना तसेच हिंदू सेनेच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या दीपिका पदुकोन, शाहिद कपूर, रणवीर सिंह, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घराबाहेरही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
‘पद्मावत’ चित्रपट बुधवारी प्रदर्शित होताच ठाणे आणि डोंबिवली शहरात करणी सेना, राजपूत सेना तसेच हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातून सुमारे २०, तर डोंबिवलीतही १५ ते २० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, पोलीस बंदोबस्तात चित्रपटाचा खेळ सुरळीत सुरू ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील कोरम मॉलमधील चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट सुरू झाल्यानंतर ५.३० वाजण्याच्या सुमारास हिंदू सेना आणि क्षत्रिय सेनेचे विजय सिंग, राहुल गुप्ता, सुरेश यादव, विशाल राय आणि सुधीर सिंग आदी कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून जोरदार निदर्शने केली. वर्तकनगर पोलिसांनी हस्तक्षेप करून विजय सिंग यांच्यासह २० जणांना ताब्यात घेतल्याचे उपनिरीक्षक सुहास हट्टेकर यांनी सांगितले. मधुबन सिनेमागृहाच्या परिसरात डोंबिवलीतून १५ ते २० जणांना ताब्यात घेतल्याचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांनी सांगितले. याच प्रकरणी नवीन पनवेल सेक्टर ११ येथील मिराज सिनेमागृहाच्या बुकिंग काउंटरची काच अज्ञाताने फोडल्याचा प्रकार २३ जानेवारी रात्री घडला. खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.