ठाण्यात उड्डाणपूल, पादचारी पुलांना चालना

By admin | Published: April 5, 2017 03:48 AM2017-04-05T03:48:25+5:302017-04-05T03:48:25+5:30

शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, शहरातील रस्ते अपुरे पडू लागले आहेत.

Thane flyovers, pedestrian bridges | ठाण्यात उड्डाणपूल, पादचारी पुलांना चालना

ठाण्यात उड्डाणपूल, पादचारी पुलांना चालना

Next


ठाणे : शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, शहरातील रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे आहे त्याच रस्त्यांच्या ठिकाणी पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पादचारी पूल आणि वाहनचालकांना पर्यायी मार्ग मिळावा यासाठी पालिका उड्डाणपुलांची निर्मिती करणार आहे. या संदर्भातील आराखडादेखील तयार झाला असून पादचारी पुलांचे कामही सुरु आहे. तर नव्याने काही उड्डाणपूल विकसित करण्याचा पालिकेचा मनोदय आहे.
ठाणे महापालिकेने यापूर्वीच सात पादचारी पुलांची कामे हाती घेतली आहेत. पैकी दोन तयार झाले असून उर्वरित पाच पुलांची कामे प्रगती पथावर आहेत. त्यानुसार आता २०१७-१८ या आर्थिक वर्षात पालिकेने घोडबंदर मार्गावर डोंगरीपाडा, भार्इंदरपाडा, गायमुख, बाळकुम अग्निशमन केंद्रासमोर, रेतीबंदर, विटावा या ठिकाणच्या रस्त्यांवर पादचारी पूल प्रस्तावित केले आहेत. तसेच माजिवडा आणि कॅडबरी जंक्शन येथे पादचारी भुयारी मार्ग प्रस्तावित केले आहेत. यासाठी २० कोटींचा खर्च प्रस्तावित केला आहे.
दुसरीकडे कळवा खाडीवरील उड्डाण पुलाचे कामदेखील प्रगती पथावर आले असून मार्च २०१८ पर्यंत मुख्य पूल व दोन मार्गिका वाहतुकीसाठी सुरु करण्याचा दावा पालिकेने केला आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ४० कोटींची तरतूद केली आहे. तर मुंबईहून ठाण्यामध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्व द्रुतगती मार्ग हा एकमेव रस्ता असून कोपरी येथील रेल्वेवरील पूल अरुंद असल्याने तेथे मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे पुलाच्या रुंदीकरणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मध्य रेल्वे यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. याशिवाय एलबीएस मार्गावर मीनाताई ठाकरे चौक, अल्मेडा चौक व संत नामदेव चौक येथे एमएमआरडीएच्या निधीतून तीन उड्डाणपूल बांधण्यात येत असून हे तिन्ही पूल डिसेंबर २०१७ अखेर खुले करण्याचा दावा पालिकेने केला आहे. कल्याण फाटा व शीळ फाटा मार्गावरदेखील एमएमआरडीएच्या निधीतून उड्डाणपूल बांधण्यात येणार असून याचे कामही येत्या तीन महिन्यात सुरु होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. (प्रतिनिधी)
>ठाणेला पूर्व सॅटीस
ठाणे पश्चिम मार्गावर सॅटीस पूल उभारण्यात आल्यानंतर आता पूर्वेलादेखील त्याच धर्तीवर सॅटीस उभारण्यासाठी पालिकेने हालचाली सुरु केल्या आहेत. महापालिकेने या प्रकल्पाचे आराखडे तयार केले असून या कामासाठी २६६ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे.
>तिनहातनाका येथे ग्रेड सेपरेटर
तीनहातनाका येथे वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून ग्रेड सेपरेटर बांधण्याचे प्रयोजन असून हा प्रकल्प ठाणे स्मार्ट सिटी या तरतुदीतून करण्याचे नियोजन आहे. यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्याकडूनही अनुदान प्राप्त करण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत.
घोडबंदर मार्गावरील डोंगरीपाडा भागात पादचारी पूल असावा अशी मागणी वारंवार केली जात होती. यासाठी येथील रहिवाशांनी यापूर्वी आंदोलनेदेखील केली होती. अखेर या संदर्भात प्रशासनाला जाग आली असून आता येथील पादचारी पुलाची मागणी खऱ्या अर्थाने मार्गी लागणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Web Title: Thane flyovers, pedestrian bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.