ठाण्यातील मोर्चा : १०० चौकसभांतून वातावरण निर्मिती, सोशल मीडियावरही भर
By Admin | Published: October 5, 2016 02:41 AM2016-10-05T02:41:50+5:302016-10-05T02:41:50+5:30
राज्यात विविध ठिकाणी निघालेल्या मराठ्यांच्या मूक मोर्चाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सर्वांचेच लक्ष लागलेला ठाण्यातील येत्या १६ आॅक्टोबरचा मोर्चा यशस्वी करण्याकरिता
ठाणे : राज्यात विविध ठिकाणी निघालेल्या मराठ्यांच्या मूक मोर्चाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सर्वांचेच लक्ष लागलेला ठाण्यातील येत्या १६ आॅक्टोबरचा मोर्चा यशस्वी करण्याकरिता कार्यकर्त्यांची जय्यत तयारी सुरु आहे. जिल्ह्यातील ज्या ज्या भागात मराठ्यांची संख्या अधिक आहे, तेथे १३ तारेखपर्यंत १०० सभा घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ठाण्यात निघणाऱ्या मोर्चात सुमारे १० लाखांचा जनसमुदाय उसळेल, असा दावा करण्यात आला आहे.
मराठ्यांना आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावे या मागणीसह इतर काही मागण्या मान्य करण्यासाठी मागील महिन्यापासून राज्यभर मराठ्यांनी एल्गार पुकारला आहे. परंतु राज्यभर निघणारे हे मोर्चे अतिशय शिस्तबध्द आहेत. ठाण्यातही तसाच शिस्तबद्ध व रेकॉर्डब्रेक मोर्चा काढण्याचा निर्धार मराठा मोर्चाचे ठाण्याचे आयोजक रमेश आंब्रे, कैलाश म्हापदी, दत्ता चव्हाण आणि अविनाश पवार यांनी केला आहे. २३ सप्टेंबर पासून या मोर्चाची तयारी सुरु झाली आहे. जिल्ह्यांचे चार भागात विभाजन करण्यात आले असून, त्यातून मोखाडा, डहाणु, जव्हार, तलासरी हे भाग वगळण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ६४ सभा झाल्या असून या सर्वच सभांना यश आल्याचे आयोजकांनी सांगितले. पहिल्या गटात विक्रमगड, वाडा, वसई, नालासोपारा, बदलापुर, अंबरनाथ, उल्हासनगर असा गट तयार करण्यात आला आहे. शहापूर, मुरबाड असा दुसरा स्वंतत्र गट तयार करण्यात आला आहे. भिंवडी हा तिसरा तर नवी मुंबई आणि ठाणे असा चवथा गट तयार करण्यात आला आहे. कुणबी समाजाने देखील या मोर्चाला पाठिंबा दिल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. ठाणे मुंबईत वास्तव्यास असलेले युपी, बिहारमधील नागरीक हे ठाकूर असल्याने त्यांंनी देखील या मोर्चात उतरण्याचा निर्धार केला आहे. कल्याणमध्ये मराठ्यांचे मोठे नेटर्वक असल्याने या भागातून अधिक नागरिक मोर्चात सहभागी होणार आहेत.
चरईत
मोर्चाची वॉर रुम
मोर्चा यशस्वी करण्यासाठी ठाण्यातील चरई भागात वॉर रुम तयार करण्यात आली असून तेथून सोशल मीडियावरील मोर्चाचा प्रचार केला जात आहे. व्हॉट्सअॅपवर मोर्चाच्या प्रचाराकरिता तीन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील नामवंत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, पत्रकार आदींचा समावेश केला आहे.
येत्या रविवारी ९ तारखेला कल्याणमधील आर्चाय अत्रे रंगमंदिरात सभा होणार असून त्याच दिवशी दिव्यात रॅली निघणार आहे. तसेच शहापूर, मुरबाडमध्येही याच दिवशी सभा घेण्यात येणार आहे. याशिवाय किन्हवली, डोळखांब येथे बुधवारी ५ तारखेला सभा होणार आहेत. त्यानुसार येत्या १३ आॅक्टोबरपर्यंत तब्बल १०० सभा घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
मुस्लीमांचा पाठिंबा : मराठा समाजाच्या मोर्चाला आता मुस्लिम समाजाचेही पाठबळ मिळणार असून मुंब्य्रातील मुस्लिम संघटनांनी या मोर्चाला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला असल्याचा दावा आयोजक कैलाश म्हापदी यांनी केला. पुरोगामी मुस्लिम संघटनांनी देखील या मोर्चाला समर्थन दिले आहे.
आठ हजार वाहनांचे पार्कींग : मुंलुड चेकनाका, तीनहात नाका आणि कॅडबरी जंक्शनवरील सर्व्हीस रोडवर सुमारे सात ते आठ हजार वाहने पार्क होऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरवात तीनहात नाक्यापासून होणार असून शेवट जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आसपास लाऊडस्पिकरची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
दोन लाख झेंडे व टोप्या
मोर्चाकरिता आचारसंहिता तयार केली असून त्याचे पालन करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत प्रचार केला जात आहे. स्वंयसेवकांचे प्रत्येकी २० जणांचे ग्रुप तयार करण्यात आले असून मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पाण्याच्या बाटल्या, २ लाख झेंडे आणि टोप्या आदींचीही व्यवस्था करण्यात आली आहे.