ठाण्यात जाणवतोय ४० टक्के दूधतुटवडा
By admin | Published: June 2, 2017 05:41 AM2017-06-02T05:41:41+5:302017-06-02T05:41:41+5:30
शेतकरी संपामुळे गुरुवारी ठाण्यात दूधटंचाई निर्माण झाली नव्हती. मात्र, ग्राहकांनी नेहमीपेक्षा जादा दूधखरेदी केल्याने ४० टक्के दुधाचा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शेतकरी संपामुळे गुरुवारी ठाण्यात दूधटंचाई निर्माण झाली नव्हती. मात्र, ग्राहकांनी नेहमीपेक्षा जादा दूधखरेदी केल्याने ४० टक्के दुधाचा तुटवडा जाणवला. शेतकरी संप लांबला, तर उद्या परवापासून दूध व भाजीपाल्याची चणचण जाणवायला लागेल, असे दूध व भाजीपालाविक्रेत्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कृषीमालास योग्य भाव मिळावा तसेच कर्जमाफी मिळावी, या मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. राज्यातील काही भागांत दूधविक्रेतेही या संपात सहभागी आहेत. संपाच्या पहिल्या दिवशी ठाण्यात दूधपुरवठ्यावर विपरित परिणाम झाला नव्हता. दूधविक्रेत्यांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला नव्हता. दोन दिवसांत शेतकरी आणि सरकार यांच्यात योग्य तो तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांच्या संपाला ठाण्यातील दूधविक्रेते पाठिंबा देतील, असे ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ठाण्यात दीड ते दोन लाख लीटर दुधाची आवक आणि तेवढीच विक्रीदेखील होते. परंतु, दूरचित्रवाहिन्यांवरील बातम्यांमध्ये लाखो लीटर दूध रस्त्यावर ओतून टाकल्याची दृश्ये पाहिल्याने उद्यापरवा कदाचित दूध मिळणार नाही, या भीतीपोटी ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणावर दुधाची खरेदी सुरू केल्याने अचानक मागणी वाढली. दररोज एक लीटर दूध घेणाऱ्या ग्राहकांनी दोन ते तीन लीटर दूधखरेदी केली. परिणामी, ४० टक्के दूध कमी पडले. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा परिसरांत जवळपास ६०० दूधविक्रेते आहेत. संपावर सरकारने योग्य तो तोडगा न काढल्यास हे सर्व विक्रेते शेतकऱ्यांच्या संपात सहभागी होतील, असे संघटनेने सांगितले. शुक्रवारी दुधाचा किती पुरवठा होईल, याची शाश्वती नसल्याचे चोडणेकर म्हणाले.
जादा पैसे आकारणाऱ्या दूधविक्रेत्यांवर होणार कारवाई
गुरुवारी दुपारी चरई येथे ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेची बैठक पार पडली. या बैठकीत जादा पैसे आकारणाऱ्या दूधविक्रेत्यांवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारपासून ते संप मागे घेईपर्यंतच्या काळात कोणत्याही दूधविक्रेत्याने छापील किमतीपेक्षा जादा दर आकारल्यास ग्राहकांनी संबंधित विक्रेत्यांची थेट संघटनेकडे तक्रार करावी. संबंधित दूधविक्रेत्यांवर संघटनेमार्फत कारवाई करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सचिव फकीरसेन वायकर, सहसचिव चोडणेकर, खजिनदार राजू वाळंज, उपाध्यक्ष दिनेश घाडगे व राम पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते. ग्राहकांनी दूधदराबाबत ९८२०७९०८१०/९९६९२६०७१२ या क्रमांकांवर तक्रारीचे आवाहन केले.
भाज्यांच्या किमतीत वाढ
शेतकरी संपामुळे गुरुवारी ठाण्यात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवला नसला, तरी शुक्रवारी नक्की जाणवेल, असे भाजीविक्रेत्यांनी सांगितले. संपामुळे गुरुवारी काही भाज्यांचे दर वाढले. यात ४२ रुपयांनी विकला जाणारा कोबी ६० रुपये, ५२ रुपये किलोची भेंडी ८०, वाटाणा ८० वरून १०० रुपये किलो, फ्लॉवर ३२ ंवरून ४० रुपये, तर घेवडा पापडी ८० वरून १०० रुपये किलोवर पोहोचली. मात्र, इतर भाज्यांचे दर जैसे थे होते. शुक्रवारपासून या भाज्यांचे दरही वाढतील, अशी शक्यता भाजीविक्रेते रमेश सांबडे यांनी वर्तवली.
भाजीपाला शेतात पडून
राज्यभरातील शेतकऱ्यांनी गुरुवारपासून संप पुकारल्याने कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात तयार असलेल्या भाजीपाला न तोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकरी व मजुरांअभावी भाजीपाला मळे ओस पडले होते. परिणामी, शुक्रवारी कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा आदी शहरांतील बाजारांमध्ये भाजी उपलब्ध होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
कल्याण तालुक्यातील आपटी, मांजर्ली, दहागाव, चौरे, घोटसई, खडवली, गुरवली, पोई, ठाकूरपाडा, फळेगाव, उशीद, काकडपाडा, पळसोली, सागोंडा, मानिवली, रायता आदी गावांतील ३५० हेक्टर क्षेत्रात शेतकरी भाजीपाल्याचे पीक घेतात. सध्या त्यांनी शेतात घोसाळी, सिमला मिरची, टोमॅटो, गवार, कारली, पडवळ, भेंडी, चवळी, दुधी आदी भाजीपाल्यांची लागवड केली आहे.
हे शेतकरी त्यांचा भाजीपाला बिर्लागेट, मोहना, शहाड, धोबीघाट, टिटवाळा, उल्हासनगर आणि कल्याण येथील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवतात. मात्र, संपाच्या भीतीने आपटी, मांजर्ली, दहागाव व इतर गावांतील शेतकऱ्यांनी गुरुवारी भाजीपालाविक्रीसाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी गुरुवारी भाजीपाला तोडलाच नाही. कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील संपाला एकमुखी पाठिंबाच दिला आहे.