‘त्या’ झाल्या सक्षम ठाणे अंमलदार
By admin | Published: March 9, 2016 12:42 AM2016-03-09T00:42:43+5:302016-03-09T00:42:43+5:30
‘जय हिंद, ठाणे अंमलदार पोलीस नाईक अंजली नागरगोजे बोलतेय...’ असा प्रतिसाद शहर पोलीस ठाण्यातून येत होता.
बारामती : ‘जय हिंद, ठाणे अंमलदार पोलीस नाईक अंजली नागरगोजे बोलतेय...’ असा प्रतिसाद शहर पोलीस ठाण्यातून येत होता. असेच काही चित्र बारामती उपविभागातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये होते. महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाण्यांचा कारभार तितक्याच समर्थपणे महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांभाळला.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बारामती उपविभागातील बारामती शहर, बारामती ग्रामीण, वडगाव निंबाळकर, भिगवण, इंदापूर, जंक्शन (वालचंदनगर) पोलीस ठाण्यांमध्ये महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच कार्यभार सांभाळला. त्यामुळे पोलीस ठाण्यांमध्ये ‘महिला राज’ असल्याचे चित्र दिसले.
महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचा कारभार महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे आज देण्याचे आदेश होते. त्याची अंमलबजावणी झाली. त्याचबरोबर, आम्हीदेखील पुरुष पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांपेक्षा कमी नाही, असेच दिवसभराचा कार्यभार संभाळताना दिसून आले. महिला पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह होता. बारामती शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी दिलेल्या सूचनेनुसार सकाळपासून कार्यभार पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे यांनी दुपारी ३ पर्यंत सांभाळला. त्यानंतर दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत कार्यभार पोलीस नाईक अंजली नागरगोजे यांच्याकडे होता. आज शहर पोलीस ठाण्यात तक्रारींचे प्रमाणदेखील कमी होते; परंतु बारामती शहरसारख्या मोठ्या पोलीस ठाण्याची जबाबदारी पार पाडताना आव्हान असल्याचे वाटले. पण, हा अनुभव महत्त्वाचा आहे, असे कार्यभार सांभाळलेल्या नागरगोजे यांनी सांगितले. शहर पोलीस ठाण्यात १ पोलीस उपनिरीक्षक व १४ महिला पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.
ग्रामीण पोलीस ठाण्याचा कार्यभार महिला पोलीस सारिका जाधव यांच्याकडे होता. या काळात ३५४चा गुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाला. गुन्हा दाखल करण्याच्या पद्धतीची माहिती यामुळे मिळाली.
पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनासह पोलीस ठाण्यातील सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून दिवसभराचे कामकाज पार पाडता आले.
या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब बांगर यांनी घेतली. त्यांनी त्यांचे
कौतुक केले.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार म्हणून पोलीस नाईक रेणुका पवार यांनी सकाळी १० पासून चार्ज घेतला. या काळात सुपे येथील मारामारीचा गुन्हा दाखल झाला.
वर्षभरापासून ठाणे अंमलदार म्हणून काम करण्याचा अनुभव आहेच; परंतु आज महिला दिनाच्या निमित्ताने वेगळा अनुभव मिळाला. सकाळपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांपासून त्याची अंमलबजावणी करण्यापर्यंत सर्व काम केले.
महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी दिल्यास त्या सोने करतात, अशी प्रतिक्रिया या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची होती. बारामती उपविभागाच्या सर्वच पोलीस ठाण्यांत महिला राज अवतरले होते.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात ५ महिला कर्मचारी आहेत. त्यांपैकी दोघी सुट्टीवर होत्या. तीन महिला कार्यरत होत्या.