ठाणे, कल्याण-डोंबिवली स्मार्ट... आणि अभिरूचीसंपन्नही
By admin | Published: September 21, 2016 03:49 AM2016-09-21T03:49:58+5:302016-09-21T03:49:58+5:30
स्मार्ट सिटीत निवड झाल्याने कल्याण डोंबिवलीत पाच वर्षांत दोन हजार ३२ कोटींची विकासकामे केली जाणार आहे.
कल्याण : स्मार्ट सिटीत निवड झाल्याने कल्याण डोंबिवलीत पाच वर्षांत दोन हजार ३२ कोटींची विकासकामे केली जाणार आहे. त्यात पालिका क्षेत्रातील स्टेशन परिसरांचा विकास, वाहतुकींच्या सुविधांत आमूलाग्र सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा सुधारणा, मलनिस्सारण आदी योजना हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली.
यादीत निवड झाल्यावर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, नगरसेवक रमेश म्हात्रे, मल्लेश शेट्टी, दीपेश म्हात्रे, सुधीर बासरे आणि शहर अभियंता प्रमोद कुलकणी आदी उपस्थित होते.
पहिल्या फेरीच्या वेळी महापालिकेला निवडणुकीमुळे पुरेसा वेळ मिळाला नव्हता. तेव्हा एक हजार ४४५ कोटीचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला होता. मात्र निवड झाली नाही. पण प्रयत्न सोडले नाहीत. जूनमध्ये प्रस्ताव सादर करण्यापूर्वी महापालिकेने स्मार्ट सिटी शिखर परिषद घेतली. तिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. केंद्राने स्मार्ट सिटीसाठी निवड केली नाही, तरी राज्यातील दहा शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्याची हमी त्यांनी दिली होती.
स्मार्ट शहरासाठी दोन हजार ३२ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. स्मार्ट सिटीसाठी पालिकेने एसपीव्ही कंपनी स्थापन केली आहे. हा प्रकल्प पाच वर्षात राबवायचा आहे. पाच वर्षात दरवर्षी २०० कोटी या प्रमाणे एक हजार कोटी रुपये मिळणार असले तरी त्यात महापालिकेचे ५० कोटी, केंद्र सरकारचे १०० कोटी आणि राज्य सरकारचे ५० कोटी असे वर्गीकरण आहे. उरलेल्या एक हजार ३२ कोटी रुपयांच्या विकास कामासाठी केंद्र सरकारच्या अन्य योजना आहेत. अमृत योजनेअंतर्गत काही प्रस्ताव तयार केले आहे. त्यातून तो विकास केला जाईल. (प्रतिनिधी)
>कल्याण-डोंबिवलीत
काय होणार स्मार्ट?
२,०३२ कोटींच्या निधीतून स्टेशन परिसरांचा विकास, तो परिसर मोकळा करून तेथे रहदारीसाठी सुविधा उभारणे, वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, पार्किंगची व्यवस्था, सिग्नल व्यवस्था, घनकचरा प्रकल्प उभारणे, झोपडपट्टी व आरोग्य विकास, सोयी सुविधा या आयटीशी जोडणे यावर भर दिला जाईल. कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा या स्टेशनांना प्राधान्य दिले जाईल. कल्याण स्टेशन परिसरात वलिपीर, शिवाजी चौक, महात्मा फुले चौक या भागाचा विकास करताना सध्याचा स्कायवॉक तोडावा लागणार असल्याचे शहर अभियंता कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
>निवडणूक गाजवलेली स्मार्ट सिटी
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपाने घेतलेल्या विकास परिषदेत स्मार्ट सिटीचा गाजावाजा झाला. त्यात मुख्यमंत्र्यांनी ६,५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. ते आचारसंहिता भंगाच्या कात्रीत सापडले. आताचा प्रस्ताव २,०३२ कोटींचा असल्याने ते त्या घोषणेपेक्षा साधारण ४,५०० कोटींनी कमी आहे.
>‘हे श्रेय शिवसेना-भाजपाचे’
ठाणे : शहराला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. शहर विकासाचे व्हिजन डोळ््यांसमोर ठेवूनच निर्णय घेतल्याने स्मार्ट सिटीच्या निकषाला आम्ही पात्र ठरलो. त्यातूनच या शहराची निवड झाली, अशा शब्दांत ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी भावना व्यक्त केल्या. ठाण्याचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव ६,५०० कोटींचा आहे. स्मार्ट शहरासाठी पाच वर्षात मिळणारा निधी, त्यातील केंद्र-राज्य सरकार आणि पालिकेचा वाटा यांचा तपशीलही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. या निधीतून महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले जाणार आहेत. प्रशासनाचे काम प्रशासनाने केले आहे. वेळोवेळी धोरमात्मक निर्णय घेण्याचे काम शिवसेना-भाजपाने केले आहे. त्यामुळे हे श्रेय शिवसेना-भाजपा युतीचे श्रेय आहे. हे टीम वर्क आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.