ठाणे महापौर मॅरेथॉनही होणार ‘सैराट’मय?
By Admin | Published: August 12, 2016 02:15 AM2016-08-12T02:15:08+5:302016-08-12T02:15:08+5:30
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा येत्या २८ आॅगस्ट रोजी होणार आहे. परंतु, आधीच आॅडिट आणि या स्पर्धेवर होणाऱ्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीच्या मुद्यावरून
ठाणे : ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा येत्या २८ आॅगस्ट रोजी होणार आहे. परंतु, आधीच आॅडिट आणि या स्पर्धेवर होणाऱ्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीच्या मुद्यावरून या स्पर्धेवर टीकेची झोड उठत असतानाच आता आणखी एका टीकेला तोंड देण्याची वेळ आयोजकांवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या स्पर्धेला इव्हेंटचे स्वरूप देतानाच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी ‘सैराट’ चित्रपटातील कलाकारांना या स्पर्धेसाठी पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, प्रत्येक कलाकाराने पाच लाखांचे मानधन मागितल्याने त्यांना बोलवायचे की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर, दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघातील महाराष्ट्राच्या मातीतील प्रतिभावंत खेळाडू अजिंक्य रहाणे यानेदेखील एक कोटीच्या मानधनाची मागणी केल्याने आयोजकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. ‘सैराट’च्या टीमला कोणत्याही परिस्थितीत आणण्यासाठी आयोजकांचा हट्ट असून रहाणे यांच्यासाठी पालिका एवढी रक्कम मोजण्यास तयार नाही.
मागील २६ वर्षे सातत्याने महापौर वर्षा मॅरेथॉन राबवणाऱ्या ठाणे महापालिकेला या स्पर्धेसाठी केला जाणारा खर्च पेलवणे कठीण झाल्याने त्यांनी यंदाची महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने या स्पर्धेसाठी ४० लाखांची तरतूद केली आहे. परंतु, दरवर्षी ती अपुरी ठरत असल्याचे नंतर लक्षात येते.
हे लक्षात घेऊनच यंदा या स्पर्धेला वेगळी उंची गाठून देण्यासाठी काहीही करण्याच्या तयारीत ते आले आहेत. त्यामुळेच यंदा मराठी चित्रपट क्षेत्रात वेगळी उंची गाठलेल्या ‘सैराट’ चित्रपटातील कलाकारांची फौज मॅरेथॉन स्पर्धेसाठी पाचारण करण्याचे महापौरांनी जाहीर केले होते.
या स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धकदेखील या कलाकारांकडे बघून सैराट होऊन त्यांनी ही स्पर्धा गाजवावी, असाच काहीसा यामागचा हेतू असल्याचे बोलले जात आहे. तसेच सध्या भारतीय क्रिकेट टीममध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारा महाराष्ट्राचा पुत्र अजिंक्य रहाणे यालाही पाचारण करण्याचा स्पर्धेच्या आयोजकांचा प्रयत्न आहे. मात्र, त्याने सुमारे एक कोटीचे मानधन मागितल्याची चर्चा सध्या पालिका वर्तुळात आहे. परंतु, पालिकेने एवढा खर्च करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)