ठाणे मेट्रो स्टेशनची कामे लवकरच सुरू
By admin | Published: March 3, 2017 03:19 AM2017-03-03T03:19:23+5:302017-03-03T03:19:23+5:30
मेट्रो प्रकल्प क्रमांक-४ अर्थात वडाळा-घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली मार्गातील विविध ३३ रेल्वे स्थानकांच्या कामांसाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत.
नारायण जाधव,
ठाणे- शहराच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या मुंबई मेट्रो प्रकल्प क्रमांक-४ अर्थात वडाळा-घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली मार्गातील विविध ३३ रेल्वे स्थानकांच्या कामांसाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत. कोणी अडथळे आणले नाहीत, तर लवकरच ठाण्यातील या ११ स्थानकांच्या बांधकामास सुरुवात होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
यात मुलुंडमधील २ आणि ठाणे शहरातील ११ स्थानकांच्या कामांचा समावेश असून दोन टप्प्यांत होणाऱ्या या कामांवर सुमारे १०७७ कोटी ३० रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामात केवळ एलिव्हेटेड रेल्वे स्थानकांच्या डिझाइन आणि बांधकामाचा समावेश असून वास्तुकला फिनिशिंग आणि स्टीलच्या छताच्या कामासाठी वेगळ्या निविदा मागवण्यात येणार आहेत.
मुलुंड फायर स्टेशन आणि मुलुंड नाका या मुंबईतील दोन स्थानकांसह ठाण्यातील तीनहातनाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन आणि माजिवडा या स्थानकांच्या कामावर ५२९ कोटी ६७ लाख, तर कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी,डोंगरीपाडा, विजय गार्डन आणि कासारवडवली या स्थानकांच्या कामावर ५४७ कोटी ६३ लाख असे एकूण १०७७ कोटी ३० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
>पॉवरलूमसह ग्रोथ सेंटरला होणार फायदा
राज्याच्या नगरविकास विभागाने गेल्या वर्षी मंजुरी दिलेल्या मेट्रो-५ अर्थात ठाणे-भिवंडी-कल्याण या ८४१६ कोटी रुपये खर्चाच्या मार्गाचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून त्याच्या कामांना सुरुवात करण्यासाठी राज्य मंत्रीमंडळ लवकरच आपली मोहोर उमटवणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे पॉवरलूमनगरीसह सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख असलेल्या कल्याण-डोंबिवली शहरांसह नजीकच्या परिसराचे रूपडे पालटून विकासास गती मिळण्यास मदत होणार आहे. भिवंडीत पॉवरलूम उद्योगासह मोठ्या प्रमाणात गोदामे असून येथे लॉजिस्टिक हब विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. कल्याणनजीकच्या शीळफाटा परिसरात ग्रोथ सेंटरसाठी जमीन संपादनाच्या कामास सुरुवात झालेली आहे. भविष्यात हे ग्रोथ सेंटर नवी मुंबई मेट्रोला जोडण्यास येणार आहे.वडाळाा भक्तीपार्क ते भांडुप सोनापूरपर्यंतच्या २० स्थानकांची कामे तीन टप्प्यांत तर मुलुंड ते कासारवडवलीपर्यंतची १३ स्थानकांची कामे अन्य दोन टप्प्यांत होतील.