ठाण्यात मनसे, बसपाला धक्का
By Admin | Published: September 20, 2016 04:43 AM2016-09-20T04:43:03+5:302016-09-20T04:43:03+5:30
गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये इनकमिंग सुरू असतानाच आता शिवसेनेतही इनकमिंग सुरू होणार आहे.
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये इनकमिंग सुरू असतानाच आता शिवसेनेतही इनकमिंग सुरू होणार आहे. मनसेच्या ३९-अ च्या नगरसेविका रुचिता मोरे आणि परिवहन समितीचे सदस्य राजेश मोरे हे मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता मनसेला आणखी एक धक्का बसणार आहे. याशिवाय बीएसीपीचे परिवहन सभापती दशरथ यादव आणि त्यांच्या आई नगरसेविका सुशीला यादव याही उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी अलीकडेच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेनेदेखील इतर पक्षातील मंडळींना आपल्याकडे खेचण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसेचे परिवहन समिती सदस्य राजेश मोरे आणि त्यांची पत्नी रुचिता मोरे (नगरसेविका) या मंगळवारी शिवसेनेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. यापूर्वी दिव्यातील नगरसेवक शैलेश पाटील आणि संगीता मुंढे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, तर सुधाकर चव्हाण यांच्यावर पक्षादेश डावलल्याने कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मनसेचे आता ७ पैकी ४ नगरसेवकच शिल्लक राहिले आहेत. तसेच काँग्रेसच्या कोपरीतील नगरसेविका मालती पाटील, त्यांचे पती रमाकांत पाटील हेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. (प्रतिनिधी)
>कोणत्याही प्रकारच्या चर्चेत सहभागी केले जात नाही तसेच कोणतीही सूचना न देता पदावरून दूर केले आहे. त्यामुळेच अखेर कंटाळून हा निर्णय घेतला आहे.
- राजेश मोरे, परिवहन समिती सदस्य, मनसे