मालमत्ता कर वसुलीकरिता ठाणे पालिका कापणार वीज
By admin | Published: March 25, 2017 02:38 AM2017-03-25T02:38:46+5:302017-03-25T02:38:46+5:30
मालमत्ताकराच्या थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ पुन्हा लागू करण्यासाठी राजकीय मंडळींचा हट्ट सुरू असताना, थकबाकीदारांची वीज कापण्याचे आदेश
ठाणे : मालमत्ताकराच्या थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ पुन्हा लागू करण्यासाठी राजकीय मंडळींचा हट्ट सुरू असताना, थकबाकीदारांची वीज कापण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. कारवाईच्या पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ५०० थकबाकीदारांची यादी महापालिका प्रशासनाने महावितरणला सादर केली असून, त्यांची बत्ती गुल करण्याची दाट शक्यता आहे.
ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या जकातीपाठोपाठ, एलबीटी वसुलीदेखील बंद झाली आहे. त्यामुळे इतर उत्पन्नांच्या स्रोतांची वसुली करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. मालमत्ताकर विभागाला यंदा ४५६ कोटींचे लक्ष्य दिले असून, आतापर्यंत ३३० कोटींची वसुली झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वसुली २५ कोटींपेक्षा अधिक आहे, परंतु मागील काही वर्षांत थकबाकीदारांचे प्रमाण वाढले असून, थकबाकीची ही रक्कम १०० कोटी रुपयांच्या वर गेली आहे. पालिकेने आता या थकबाकीदारांविरोधात मोहीम उघडली आहे.
घनकचरा उचलण्याकरिता लागू केलेल्या कराच्या वसुलीकरिता, गुरुवारी महापालिकेने व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर ‘कचरा फेको’ आंदोलन केले. यामुळे राजकीय वातावरण तापले. आता मालमत्ताकराची थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठाच खंडित करण्याचा मार्ग महापालिकेने अवलंबला आहे. ज्यांची विजेची थकबाकी शून्य आहे, परंतु मालमत्ताकराची थकबाकी लाखभर रुपये आहे, अशांची वीज कापण्याचा निर्णय कायद्याच्या निकषावर कसा टिकतो व महावितरण महापालिकेची थकबाकी वसूल करण्याकरिता आपल्या ग्राहकांवर किती तत्परतेने कारवाई करते, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. पहिल्या टप्प्यात एक लाखांच्या वर थकबाकी असलेल्यांची बत्ती गुल केली जाणार आहे. ही थकबाकी असलेल्यांची संख्या ५०० च्या वर आहे.(प्रतिनिधी) ी