ठाणे पालिका आयुक्तांचा सर्जिकल स्ट्राइक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2016 03:43 AM2016-11-19T03:43:19+5:302016-11-19T03:43:19+5:30
महापौरांनी सचिव विभागाला लिहिलेल्या पत्रावरून शुक्रवारच्या महासभेत गदारोळ झाला.
ठाणे : महापौरांनी सचिव विभागाला लिहिलेल्या पत्रावरून शुक्रवारच्या महासभेत गदारोळ झाला. महापौरांना विश्वासात न घेता विषयपत्रिका सभागृहासमोर आणलीच कशी, असा प्रश्न करत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी प्रशासनाला अचडणीत आणले. सचिवांनी चूक मान्य केल्यावर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापौरांच्या लेटरबॉम्बला सर्जिकल स्ट्राइकने उत्तर देऊन पटलावरील इतिवृत्त वगळता सर्वच विषय मागे घेत नगरसेवकांची कोंडी केली.
महासभा सुरू होताच सचिवांनी विषयपत्रिका वाचताच शिवसेनेचे नगरसेवक दशरथ पालांडे यांनी हरकत घेत महापौरांच्या नावाचा उल्लेख का केला नाही, असा सवाल केला. तर, सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत यांनी महापौरांनी सचिव विभागाला जे पत्र दिले आहे, त्याचे वाचन सभागृहात करावे, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला विरोधकांनी साथ दिली. सचिवांनी हे पत्र वाचण्यास टाळाटाळ केली. मग आयुक्त सभागृहात येताच त्यांनी पत्र वाचण्यास सांगितले. त्यात काही विषय चर्चा न करताच पटलावर आणण्यास महापौरांनी हरकत घेतली होती. ही बाब चुकीची असून ते विषय प्रशासनाने मागे घ्यावेत, अशीही मागणीही महापौरांनी केली होती.
याच मुद्यावरून पुन्हा सत्ताधारी आक्रमक झाले आणि त्यांनी प्रशासनावर तोंडसुख घत महापौरांना विश्वासात घेऊनच विषयपत्रिका आणण्यावर भर दिला. सचिवांकडून ही चूक तीन वेळा झाल्याचा आरोप विलास सामंत यांनी केला. सचिवांकडून खुलासा मागितला. त्यावर सचिव मनीष जोशी यांनी महापौरांनीच १८ तारखेला महासभा घ्यावी, असा निर्णय घेतल्याचे सांगून त्याची विषय पत्रिका ९ तारखेला प्रसिद्ध करणे बंधनकारक होते. काही विषय उशिराने आल्याने त्याची माहिती महापौरांना देणे आवश्यक असतांनाही केवळ कायदेशीर अडचणी लक्षात घेऊन ही विषय पत्रिका प्रसिद्ध केल्याचे सांगत चूक झाल्याचे कबूल केले. सचिवांच्या खुलाशानंतर महासभा सुरळीत सुरु होईल, अशी शक्यता असतांनाच आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही प्रशासनाची चूक मान्य करत केली. यापुढे एखाद्या विषयाचा गोषवारा उपलब्ध झाला नाही तर तो विषय पटलावर घेतला जाणार नाही असे सांगून अशी चूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करू असे जाहीर करत सर्व विषय माघे घेतल्याचे जाहीर केल्याने महापौरांच्या लेटरबॉम्बला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले.
आयुक्तांच्या सर्जिकल स्ट्राईकने सर्वच नगरसेवक हादरले. पण याचे खापर त्यांनी महापौरांवर फोडले. तुम्ही या मानपमानाच्या नाट्यात पडला नसतात तर नगरसेवकांच्या प्रभागातील रखडलेले प्रस्ताव मार्गी लागले असते, असा टोला काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी लगावला. सत्ताधाऱ्यांनीही महासभा घेण्याची मागणी केली. परंतु, आयुक्त आपल्या मतावर ठाम राहिले. त्यामुळे ही महासभा पुन्हा होणार असे महापौर सांगत असले, तरी थेट पुढील महिन्यात महासभा होईल, असे आयुक्तांनी सांगितल्याने सर्वपक्षीय सदस्य हबकले. त्या सभेत विषय मंजूर झाल्यावर लगेचच आचारसंहिता लागली, तर कामे होणार कधी असा प्रश्न त्यांना पडला. (प्रतिनिधी)
>प्रशासनाची मनमानी; महापौरांचा आरोप
सदस्यांचे विषय मार्गी लागावे हीच माझी नेहमी इच्छा होती. परंतु,अनेक वेळा सदस्यांचे विषय मागे ठेवून प्रशासन स्वत:चे विषय पटलावर आणत होते असा गौप्यस्फोट महापौर संजय मोरे यांनी सभागृहासमोर केला. रस्त्यांच्या विषयातही प्रशासनाकडून आडकाठी घातली गेली होती. वारंवार असे प्रकार घडत असल्याने ठाण्याचा प्रथम नागरिक म्हणून मी हा पत्रव्यवहार केला होता. परंतु, त्याचा कुठेही गवगवा केला नसल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
सत्ताधारी नगरसेवकांचा सभात्याग
महापौरांना डावलून प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून प्रशासनाला कामे करायची नसल्याचे सांगत शिवसेनेचे नगरसेवक काशीराम राऊत यांनी सभागृहात विषय पत्रिका उधळून प्रशासनाचा निषेध करून सभात्याग केला. प्रशासनाकडून अशा प्रकारे नगरसेवकांची पिळवणूक सुरु असून, नगरसेवकांची कामे होऊ नयेत हीच त्यांची इच्छा असल्याचे मत व्यक्त करून शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांनीही सभात्याग केला.