‘पैसे उकळण्यासाठीच ठाणे पोलिसांची कारवाई’
By admin | Published: July 6, 2017 04:36 AM2017-07-06T04:36:27+5:302017-07-06T04:36:27+5:30
शहर व परिसरातील पेट्रोलपंपांवर ठाण्याच्या पोलीस पथकाने केलेली कारवाई ही केवळ पैसे उकळण्यासाठी असल्याचा आरोप पेट्रोलियम डीलर्स
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद/ठाणे : शहर व परिसरातील पेट्रोलपंपांवर ठाण्याच्या पोलीस पथकाने केलेली कारवाई ही केवळ पैसे उकळण्यासाठी असल्याचा आरोप पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने बुधवारी एका पत्रकार परिषदेत केला. पोलिसांच्या कारवाईमध्येच साशंकता असून, सहायक पोलीस आयुक्त दर्जावरील अधिकाऱ्यास पंप तपासणीचे अधिकार आहेत; परंतु शहरातील पंपांवर पोलीस निरीक्षकांच्या पथकाने छापे मारल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. तर इंधन घोटाळ्यामध्ये उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केलेल्या डोंबिवलीच्या विवेक शेट्ये याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
इंधन वितरणासाठी असलेली यंत्रणा ही कंपन्यांच्या अखत्यारित असते व वजन-मापे विभागामार्फतच मोजमापाची साधने दिली जातात, त्यामुळे वितरकांना दोषी धरण्याऐवजी संबंधित कंपन्या आणि वजन-मापे विभागाला दोषी धरले पाहिजे, असे असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास म्हणाले. याप्रकरणी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना संघटनेने निवेदन दिले आहे.
इंधन घोटाळ्यामध्ये उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केलेल्या डोंबिवलीच्या विवेक शेट्ये याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राज्यातील पेट्रोल पंपांना इलेक्ट्रॉनिक चिप्स त्याने विकल्याचा संशय ठाणे पोलिसांना आहे. शेट्ये याने इलेक्ट्रॉनिक्समध्ये एमएससी केले असून, इलेक्ट्रॉनिक चिप्स त्यानेच तयार करून विकल्याचा संशय ठाणे पोलिसांना आहे. न्यायालयाने त्याला ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कारवाई सुरूच ठेवणार
पैशांसाठी नव्हे तर, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. तंत्रज्ञांकडून मीटरमध्ये फेरफार केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. तसेच ही कारवाई पोलीस निरीक्षक करू शकतात, असे ठाणे क्राईम ब्रँचचे सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांनी लोकमतला सांगताना असोसिएशनने या कारवाईविरोधात कोर्टात जावे, असे आव्हान त्यांनी दिले.