ठाण्याचे पोलीस हवालदार राज्यातून अकरावे
By admin | Published: May 26, 2017 04:24 AM2017-05-26T04:24:07+5:302017-05-26T04:24:07+5:30
कळवा पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेले कुणाल गांगुर्डे महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात आलेल्या पोलीस
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळवा पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेले कुणाल गांगुर्डे महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रातून अकरावे तर ठाण्यातून प्रथम आले. वडिलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या कुणाल यांचे केवळ ठाण्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.
कुणाल यांचे वडील धर्मा गांगुर्डे सहाय्यक उपनिरीक्षक या पदावरून निवृत्त झाले आहेत. कुणाल यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. परंतु पोलीस खात्याची त्यांना आवड असल्याने वडिलांकडून प्रेरणा घेऊन ते या सेवाक्षेत्रात आले. गेली दहावर्षे ते पोलीस खात्यात असून, सध्या कळवा पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत.
आपल्या मुलाने आणखीन मोठ्या पदावर असावे, असे स्वप्न त्यांच्या वडिलांनी बाळगले होते. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करीत पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी सहा महिने सुट्टी घेऊन दिवसातील १६ तास अभ्यास केला. सकाळ - संध्याकाळ तीन तास ते मैदानावर सराव करीत तर उर्वरित वेळ लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करीत. या आधी त्यांनी दोन ते तीन वेळा ही परीक्षा दिली होती. परंतु त्यांना यश आले नाही. यावेळेस त्यांनी उत्तीर्ण होण्याचे मनावर घेतले आणि महाराष्ट्रातून अकरावे तर ठाण्यातून प्रथम आले.