तपासासाठी ठाणे पोलीस नागपुरात
By admin | Published: March 19, 2017 02:02 AM2017-03-19T02:02:19+5:302017-03-19T02:02:19+5:30
सैन्य भरती घोटाळा प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत असताना या परीक्षा यंत्रणेबाबतच्या सैन्य दलातील संबंधितांचे जबाब नोंदवण्यासाठी तसेच हस्ताक्षरांचे नमुने घेण्यासाठी
ठाणे : सैन्य भरती घोटाळा प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत असताना या परीक्षा यंत्रणेबाबतच्या सैन्य दलातील संबंधितांचे जबाब नोंदवण्यासाठी तसेच हस्ताक्षरांचे नमुने घेण्यासाठी ठाणे पोलिसांचे एक विशेष पथक नागपूरला रवाना झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या कामासाठी हे पथक काही दिवसांसाठी नागपुरात तंबू ठोकणार असल्याने आणखी काही उलगडा होण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
२६ फेब्रुवारीला देशभरात सैन्यातील ४ पदांसाठी पार पडलेल्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी आतापर्यंत २४ जणांना ठाणे पोलिसांनी नागपूर, पुणे, गोवा येथून अटक केली आहे. तसेच सध्या ते सर्व जण न्यायालयीन कोठडीत आहेत. यामध्ये काही आजी-माजी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील लिपिक रवींद्रकुमार जांगू, धरमवीरसिंग आणि निगमकुमार पांडे हे या टोळीतील प्रमुख आरोपी आहेत. त्यांनी या घोटाळ्यातील पैशांची आग्रा आणि हरयाणा येथे मालमत्ता खरेदी केल्याची बाब पुढे आहे. याचदरम्यान तपासात रवींद्रकुमार जांगू याने सैन्य भरतीच्या मंडळाच्या दिल्ली येथील मुख्यालयातून प्रश्नपत्रिकेची सीडी नागपूर येथील कार्यालयाकडे छापण्यासाठी पाठवल्यानंतर तिचा पासवर्ड मिळाला होता. मात्र, तो कसा मिळवला, हे पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी त्यानुसारच त्याला प्रात्यक्षिक करून तो पासवर्ड ओळखण्यास सांगितले होते. पण त्या वेळी रवींद्रकुमार याला तो ओळखता आला नाही.
ठाणे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे पथक याबाबतच्या अधिक तपासासाठी नागपुरात नुकतेच दाखल झाले
आहे. (प्रतिनिधी)
जबाब नोंदविणार
अधिक तपासासाठी नागपुरात नुकतेच पथक दाखल झाले आहे. हे पथक परीक्षा केंद्रावरील कारवाईदरम्यान मिळून आलेल्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर नमुने तसेच या परीक्षा यंत्रणेबाबतच्या नागपूर येथील सैन्य कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.