ठाणे पोलिसांनी केला पोर्टेबल लायटिंग टॉवरचा वापर, राज्यातील पहिला अभिनव उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 05:44 PM2017-10-05T17:44:55+5:302017-10-05T17:57:00+5:30

मुंब्य्रासारख्या भागातील रेती बंदर घाट परिसरात देवी विसर्जन करणा-या भाविकांसाठी तसेच मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी गर्द अंधारामुळे कोणताही गैर प्रकार होऊ नये यासाठी राज्यात प्रथमच ठाणे पोलिसांनी ‘पोर्टेबल इनफ्लेटेबल लायटिंग टॉवर’चा वापर केला.

Thane police used the portable lightning tower for the Goddess immersion and Moharram bandobasta | ठाणे पोलिसांनी केला पोर्टेबल लायटिंग टॉवरचा वापर, राज्यातील पहिला अभिनव उपक्रम

ठाणे पोलिसांनी केला पोर्टेबल लायटिंग टॉवरचा वापर, राज्यातील पहिला अभिनव उपक्रम

googlenewsNext

ठाणे: मुंब्य्रासारख्या भागातील रेती बंदर घाट परिसरात देवी विसर्जन करणा-या भाविकांसाठी तसेच मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी गर्द अंधारामुळे कोणताही गैर प्रकार होऊ नये यासाठी राज्यात प्रथमच ठाणे पोलिसांनी ‘पोर्टेबल इनफ्लेटेबल लायटिंग टॉवर’चा वापर केला. यामुळे मिरवणुकीतील बंदोबस्ताबरोबरच काळ्याकुट्ट अंधारात भाविकांना लख्ख प्रकाशाची सुविधा देण्याचा अनोखा उपक्रम पोलिसांनी राबविल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.

दस-याच्या दिवशी ३० सप्टेंबर रोजी ठाण्यात सार्वजनिक ११७ देर्वीच्या मूर्ती, आठ प्रतिमा, दोन घट तर खासगी १९४ मूर्ती, १२ प्रतिमा आणि ५२७ घट अशा ३११ मूर्ती, २० प्रतिमा आणि ५२९ घटांचे शहरातील वेगवेगळ्या तलाव आणि खाडी परिसरात विसर्जन करण्यात आले. १ आॅक्टोंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोहरम निमित्ताने २७ सार्वजनिक पंजे आणि सहा ताबूत तसेच २६० पंजे, १२ प्रतिमा आणि नऊ ताबूत असे २८७ पंजे, १२ ताजिया, १५ ताबूत अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या होत्या.

कळवा रेतीबंदर घाट परिसरात देवी विसर्जन मिरवणुका येत असताना तसेच मोहरम निमित्ताने काढलेल्या मिरवणुका रेतीबंदर मुंब्रा येथे विसर्जनासाठी येत असताना अपु-या प्रकाश व्यवस्थेमुळे मिरवणुकीतील सामान्य नागरिक तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही समोरील दृश्य दिसणे अवघड जात होते. त्यामुळेच अशा मिरवणुकांवर नियंत्रण ठेवणेही पोलिसांना आव्हानात्मक होते. यंदा हीच समस्या पुन्हा उद्भवू नये, यासाठी या मिरवणुकांच्या दरम्यान पोर्टेबल इनफ्लेटेबल लायटिंग टॉवरचा विशेष वापर मुंब्रा आणि कळवा पोलिसांनी केला.
रात्रीच्या वेळी प्रखर प्रकाशासाठी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी सहज नेता येईल, अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या या टॉवरचा उपयोग करण्यासाठी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडणेय, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या मिरवणुकांच्या वेळी कळवा आणि मुंब्रा भागात उत्कृष्टरीत्या वापर करण्यात आला. त्यामुळे मोहरमच्या मिरवणूकाही कोणत्याही अडथळयाविना पार पडल्याची माहिती स्वामी यांनी दिली. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनाही या अनोख्या सुविधेचा चांगल्या प्रकारे उपयोग झाल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कुठे होतो लायटिंग टॉवरचा उपयोग...
ठाणे पोलिसांनी प्रथमच रात्रीच्या बंदोबस्तासाठी उपयोगात आणलेल्या या लायटिंग टॉवरचा उपयोग खाण उद्योग, चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान, आधुनिक शेती व्यवसायासाठी, इमारत बांधकाम व्यावसायाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाचे काम पूर्ण करण्यासाठी रात्रीच्या वेळी प्रखर प्रकाशासाठी करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील अगदी अंधा-या भागातून जाणा-या देवी तसेच मोहरमच्या मिरवणुकांसाठी या अत्याधुनिक लायटिंग टॉवरचा वापर करण्यात आला.

Web Title: Thane police used the portable lightning tower for the Goddess immersion and Moharram bandobasta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.