ठाणे रेल्वे स्थानकात २५ हजार फुकटे!
By admin | Published: July 8, 2017 05:39 AM2017-07-08T05:39:53+5:302017-07-08T05:39:53+5:30
लोकलने विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने सामाजिक गुन्हा आहे. याबाबत रेल्वेला सहकार्य करावे, असे प्रवासात आपण ऐकत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लोकलने विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने सामाजिक गुन्हा आहे. याबाबत रेल्वेला सहकार्य करावे, असे प्रवासात आपण ऐकत असतो. रेल्वेने वारंवार सूचना करूनसुद्धा लोकलने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढत आहे. ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात मे ते जून २०१७ या ३ महिन्यांत सुमारे ५ हजार तर मागील वर्षभरात २० हजारहून अधिक फुकटे ठाणे स्थानकात टीसींंच्या जाळयात अडकले आहेत. त्यांच्याकडून ६२ लाखांहून अधिक दंडही वसूल केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
ठाणे स्थानकात दररोज सुमारे
७-८ लाख प्रवासी येजा करीत असल्याने ते नेहमीच गजबलेले असते. येथे एकूण १० फलाट असून, मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल धावतात. त्यातच या स्थानकातून आतबाहेर करण्यासाठी जवळपास अधिकृत १९ मार्गिका आहेत. त्यामधील फलाट क्रमांक २ आणि १० यावरून थेट बाहेर पडणे शक्य होते. शहराचे दिवसेंदिवस झपाट्याने नागरिकरण होत असल्याने त्याचा स्थानकावर ताण पडतो.
सर्वाधिक व्यस्त स्थानक अशी ओळख असलेल्या या स्थानकातून ठाणे ते बोरीबंदर ही पहिली लोकल धावली. या रेल्वे स्थानकाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने येथे पहिल्या सरकत्या जिन्यापासून वातानुकूलित शौचालयासह अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची व्यवस्था केली. त्यातच, मुंबईच्या आसपासच्या शहरांमध्ये येण्याजाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकाची मदत होत असल्याने या स्थानकात लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. फुकट्यांना पकडण्यासाठी सुमारे २४ टीसींची मंजूर पदे आहेत. त्यांनी एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षभरात २० हजार २४५ विनातिकीट प्रवाशांना पकडून सुमारे ४८ लाख ६९ हजार ८१२ रुपयांचा दंड वसूल केला. विशेष म्हणजे अशा प्रकारे फुकट प्रवास करणारे प्रवासी हे फलाट क्र मांक २, ९ व १० वर अधिक प्रमाणात आढळून आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
फुकट्यांमुळे रेल्वे मालामाल
ठाण्यात पकडलेल्या फुकट्यांकडून जर ६२ लाख २८ हजार ५२७ रुपये वसूल केला आहे. जर त्यांनी तिकीट काढून प्रवास केला असता, तर रेल्वेच्या तिजोरी काही लाख रुपये जमा झाले असते. मात्र, या फुकट्यांमुळे रेल्वेच्या तिजोरीत ६२ लाखांहून अधिक रक्कम दंड स्वरूपात जमा झाल्याने रेल्वे मालामाल झाली आहे.
यंदा आकडा वाढला : २०१५-१६ मध्ये ठाण्यात ७ हजार ९९२ विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडले होते. त्यावेळी त्यांच्याकडून २२ लाख ६३ हजार दंड वसूल केला होता. तर २०१६-१७ या वर्षात हा आकडा चक्क २० हजार २४५ वर गेल्याने फुटक प्रवास करताना पकडणाऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. तसेच त्यांच्याकडून ४८ लाख ६९ हजार ८१२ रुपये दंड वसूल केल्याचे रेल्वेने सांगितले.