ठाण्यात निवासी डॉक्टरला मारहाण
By admin | Published: March 30, 2017 04:07 AM2017-03-30T04:07:05+5:302017-03-30T04:07:05+5:30
ठाणे जिल्हा (सिव्हिल) शासकीय रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर जावेद शेख यांना, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी बुधवारी
ठाणे : ठाणे जिल्हा (सिव्हिल) शासकीय रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर जावेद शेख यांना, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी बुधवारी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत शेख जखमी झाले आहेत. संतप्त जमावाने अपघात विभागात तोडफोड केली आणि तेथील शिकाऊ डॉक्टरांना शिवीगाळ करत ‘बघून घेऊ’ अशी धमकी दिली. मारहाणीच्या निषेधार्थ शिकाऊ डॉक्टरांनी ‘कामबंद’ आंदोलनाचा इशारा दिला असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सी.बी. केम्पीपाटील यांनी रुग्णालय सुरू असल्याचे स्पष्ट केले. मारहाणप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून, गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.
बुधवारी दुपारी महागिरीतील मेमन याच्या हाताला जखम झाल्याने त्याला रुग्णालयात आणले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना, सलाइन लावण्यावरून रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांनी शिकाऊ डॉक्टर शेख यांच्याशी हुज्जत घातली. इतकेच नव्हे, तर मेमन आणि त्याच्या नातेवाइकांनी शेख यांना मारहाण केली, अन्य डॉक्टर दिबानाज अन्सारी हिच्या अंगावर रुग्णाचे नातेवाईक धावून गेले. अपघात विभागातून जाताना त्यांनी दरवाजाची व काचांची तोडफोड केली.
ही घटना घडली, तेव्हा ड्युटीवरील पोलीस हजर नसल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. रुग्णाला घेऊन आलेला जमाव हा १५-२० जणांचा होता. रुग्णावर तत्काळ उपचार सुरू के ले होते. रुग्णाला ज्या ठिकाणी जखम झाली होती, तेथेच सलाइन लावल्याचा आग्रह नातलगांनी केला. मात्र, त्याला शेख यांनी विरोध केल्याने नातेवाईक संप्तत झाले. त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. (प्रतिनिधी)
रुग्णाच्या हाताला धारदार शस्त्राने जखम झाली होती, तरीसुद्धा त्याचे पेपर तयार करण्यात वेळ न दवडता, तत्काळ उपचार सुरू केले होते. घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी ‘कामबंद’ आंदोलनाचा इशारा दिला असला, तरी रुग्णालय बंद राहणार नाही.
- डॉ. सी. बी. केम्पीपाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
ज्या भागात मारहाण झाली, तेथे सीसीटीव्ही नाहीत. मात्र, रुग्णालयात इतर ठिकाणी असलेल्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांची पाहणी केली असून, त्यामध्ये पोलीस रुग्णालय परिसरात असल्याचे दिसतात, तसेच १०-१५ जणांचा जमाव असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
- अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर