ठाण्याचा शेर कोण शिंदे की चव्हाण?
By admin | Published: July 18, 2016 03:32 AM2016-07-18T03:32:29+5:302016-07-18T03:32:29+5:30
महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही कल्याण-डोंबिवली निवडणुकीप्रमाणेच शिवसेना-भाजपात संघर्ष
अजित मांडके,
ठाणे- महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही कल्याण-डोंबिवली निवडणुकीप्रमाणेच शिवसेना-भाजपात संघर्ष होईल, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याकरिता भाजपाने डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद दिले आहे, हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. महापालिका निवडणुकीचीही जबाबदारी चव्हाण यांनाच देण्यात येईल व पर्यायाने शिवसेनेच्या ठाण्यातील वाघाच्या जबड्यात हात घालून विजयश्री खेचून आणण्याची जबाबदारी चव्हाण यांचीच असेल.
सर्वच पक्षांनी महापालिकेकरिता आपली ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेसला बळ देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष ठाणे वारीला येणार असून पुढील महिन्यापासून सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात कॉंग्रेसवाले रस्त्यावर उतरणार आहेत. मनसेकडे बडा चेहरा नसला तरीदेखील आतापासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे मागील दीड वर्षापासून रिक्त असलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपदही आता भरले गेले असून राष्ट्रवादीची येत्या काही दिवसांत नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. परंतु, खरी लढत ही शिवसेना आणि भाजपामध्येच होईल, हे सर्वश्रुत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा मागोवा घेतला असता त्या ठिकाणी भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या खेळीमुळे शिवसेनेची अनेक गणिते बिघडल्याचे दिसून आले. तसेच कल्याण-डोंबिवलीत त्यांचे वजन पाहता ते आता भाजपाचे एक सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येऊ लागले आहेत. खासदार कपिल पाटील यांच्यावरदेखील महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने तेदेखील आता ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत सक्रिय झाले आहेत. त्यांनीदेखील शिवसेनेची अंडीपिल्ली बाहेर काढायचे ठरवले आहे.
शिवसेनेनेही भाजपाची ही खेळी लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी यापूर्वीच सुरू केली आहे. त्यांनी भाजपाच्या आधीच इतर पक्षांतील नगरसेवक आपल्या छावणीत आणण्यास सुरुवात केली आहे. काहींनी जाहीर प्रवेश केला आहे, तर येत्या काही काळात काहींची प्रवेश करण्याची तयारी सुरू आहे. याशिवाय, शहरात होत असलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठीदेखील आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु, त्यांचे श्रेय लाटण्यासाठी भाजपाने आता विनय सहस्रबुद्धे यांच्या चाणक्यनीतीची मदत घेण्याचे ठरवले आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी ठाण्यात एक पत्रकार परिषद घेऊन प्रत्येक महिन्याला ठाण्याला भेट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच शिवसेनेच्या खासदारांनी ज्या प्रकल्पांचा पाठपुरावा केला आहे किंवा जे प्रकल्प मार्गी लावले आहेत, अशा बहुतेक प्रकल्पांचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचे आश्वासन देत शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.
येत्या काही दिवसांत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या या सामन्यात आणखी रंगत वाढणार असून थेट आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपासून भाजपाच्या दिल्लीतील टीमने ठाण्याचा छुपा दौरा सुरू केला असून प्रत्येक प्रभागाची चाचपणी सुरू केली आहे. कुठे शिवसेनेचा प्रभाव आहे, त्या ठिकाणी कशा पद्धतीने खेळी केली जाऊ शकते, कोणता उमेदवार कुठे प्रभावी ठरू शकतो, अशा चर्चा काही पदाधिकारी आणि नगरसेवकांबरोबर करण्यात आल्याची माहिती कानांवर येत आहे. यापुढेही जाऊन, चार वॉर्डांचा एक प्रभाग केला तर त्याचा अधिक फायदा कोणत्या पक्षाला होऊ शकतो, याचीदेखील जोरदार चाचपणी या टीमने केली आहे. परंतु, ठाण्यातील कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून याचा फायदा जास्त शिवसेनेलाच होऊ शकतो, असा सूर लावला. युती केली तर भाजपाला किती जागा मिळू शकतात, याचीही चाचपणी केली जात आहे.
शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाने कपिल पाटील, रवींद्र चव्हाण आणि विनय सहस्रबुद्धे यांना मैदानात उतरवले आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना जनसंपर्क व मनगटशाही या दोन पातळ्यांवर रवींद्र चव्हाण शह देऊ शकतात.एकनाथ शिंदे यांची चाणाक्ष बुद्धी आणि ऐनवेळेस फासे कसे टाकायचे, गणिते कशी बदलायची याचा दांडगा अनुभव आहे. शिवाय, गटातटांचे राजकारण निवडणुकीच्या तोंडावर थोपवण्याची धमक त्यांच्यात आहे. त्यांचा आदेश हा पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अंतिम असल्याने प्रत्येक कार्यकर्ता जीव ओतून कामाला लागतो, हे आतापर्यंत त्यांच्या यशाचे गमक आहे.
त्या तुलनेत चव्हाण यांना कल्याण-डोंबिवलीचाच अनुभव आहे. ठाण्यात ते फारच नवीन आहेत. शिवाय, संदीप लेले व संजय केळकर हे चव्हाण यांच्या वाढत्या वर्चस्वामुळे दुखावण्याचा धोका आहे. कल्याण-डोंबिवलीपेक्षा ठाण्याची गणिते ही फार वेगळी आहे. येथील वातावरण वेगळे आहे.
>चव्हाणांचा लागणार कस
येत्या काही दिवसांत रवींद्र चव्हाण यांच्याच खांद्यावर ठाणे महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवल्याची घोषणा करण्याची औपचारिकता पार पाडली जाण्याची शक्यता आहे.
शहर भाजपामध्ये आजही गटातटांचे राजकारण शिजत आहे. चव्हाण यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्टॅम्प बसला आहे. फडणवीस यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे पंकजा मुंडे यांच्यापासून विनोद तावडे यांच्यापर्यंत अनेक मंत्री नाराज असून त्यांचे समर्थक ठाण्यात आहेत. हे गटातटांचे राजकारण सांभाळताना चव्हाण यांना शिवसेनेशी दोन हात करावे लागणार असल्याने त्यांचा कस लागणार आहे. मुळात ठाण्याचा शेर कोण, ते ही निवडणूक ठरवणार आहे.